Advertisement

दिवाळीनंतर शाळा होणार सुरू , उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीनंतर शाळा होणार सुरू , उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही प्रत्यक्षात सुरू होऊ न शकलेल्या शाळा दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार ७ नोव्हेंबर २०२० रोजी दिले आहेत.

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासोबत व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी हे निर्देश दिले. त्यानुसार २३ नोव्हेंबरपासून शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी (coronavirus) लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ती सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.

शाळांचं सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी खूश खबर! दिवाळीची सुट्टी झाली १४ दिवसांची

चार तासांची शाळा

२३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधे (school) विद्यार्थ्यांचं थर्मल चेकिंग करण्यात येईल. एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावं, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्या; तसंच शाळा व्यवस्थित सुरू राहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.

शिक्षकांची तपासणी करणार 

शाळा सुरू होण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. 

शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असं अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सांगितलं.

(schools in maharashtra will start after diwali vacation says cm uddhav thackeray)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा