
शाळेतील मुलांची ने-आण करताना होणारे अपघात, स्कूल बसची नियमित देखभाल न करणं, मुलांना स्कूल बसमध्ये जागा नसतानाही कोंबणं असे अनेक प्रकार दरवर्षी घडतात. त्यामुळं शाळेत जाणाऱ्या छोटया मुलांची सुरक्षित वाहतूक हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालला आहे. दरम्यान ही स्कूल बस सेवा अधिकाअधिक सुरक्षित करण्यासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विशेष सुरक्षा मोहीम राबवण्यात येणार आहे.
सध्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या खासगी आणि अनुदानित शाळेतील बसेसेवेबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. तसंच या नियमावलीचं वारंवार उल्लंघन करणारी वाहनं आणि वाहन चालक यांची प्रामुख्यानं काही विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे तपासणी करण्यात यावी, असं प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस विभागातर्फे शाळा प्रशासनाला सांगण्यात आलं आहे.
या मोहिमेला २५ जूनपासून सुरूवात करण्यात आली असून येत्या ९ जुलै पर्यंत सर्व शाळेच्या स्कूल बस तसचं स्कूल व्हॅनची विशेष तपासणी करण्यात यावी, असे आदेश प्रादेशिक परिवहन विभागातर्फे देण्यात आले आहेत. या नियमांचं पालन न करणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात येईल, असेही आदेश परिवहन विभागातर्फे देण्यात आले आहेत.
