Advertisement

दहावीचा निकाल जुलैमध्ये लागणार?

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी मूल्यमापन पद्धत कशी असावी आणि वेळापत्रक याचा तपशील राज्य शिक्षण मंडळाने बुधवारी जाहीर केला आहे.

दहावीचा निकाल जुलैमध्ये लागणार?
SHARES

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी मूल्यमापन पद्धत कशी असावी आणि वेळापत्रक याचा तपशील राज्य शिक्षण मंडळाने बुधवारी जाहीर केला आहे. या नुसार दहावीचा निकाल जुलै महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

यावर्षी नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन शाळेय स्तरावर करण्यात येऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याकरीता राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेचं वेळापत्रक आणि निकाल तयार करण्याची कार्यपद्धती बुधवारी जाहीर केली आहे. सोबतच राज्य मंडळाकडून मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी १० जूनला यूट्यूबद्वारे मूल्यमापनाबाबत कार्यशाळा घेतली जाणार आहे.

'असं' आहे वेळापत्रक 

या मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत ७ सदस्यांची निकाल समिती स्थापन करावी लागणार आहे. विषय शिक्षक आणि वर्ग शिक्षकांना ११ जून ते २० जून या १० दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुणतक्ते संकलित करून ते शाळा समितीकडे सादर करायचे आहेत. वर्ग शिक्षकांनी तयार केलेले निकाल प्रमाणित करण्यासाठी निकाल समितीला १२ ते २४ जून ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २१ जून ते ३० जून या मुदतीत निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मुख्याध्यापकांनी मंडळाच्या निकाल प्रणालीमध्ये भरायचे आहेत. २५ जून ते ३० जून या कालावधीत निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल आणि अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे मुख्याध्यापकांनी लाखबंद पाकिटात विभागीय मंडळात जमा करायचे आहेत.

निकाल समितीने प्रमाणित केलेल्या केलेल्या निकालाच्या २ प्रती असतील, त्यातील एक पत्र मुख्याध्यापकांकडे तर दुसरी प्रत मंडळाकडे जमा होईल. सोबतच विद्यार्थ्याच्या नववीच्या संकलित निकालाची प्रतही मुख्याध्यापकांनी विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे.

हेही वाचा- बारावीच्या निकालानंतरच प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्णय-उदय सामंत

‘असे’ मिळतील गुण

दहावीचे गुणदान करताना पहिल्या ५० गुणांसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या नववीच्या १००पैकी असलेल्या गुणांचे शाळास्तरावर ५० टक्के गुणांत रूपांतर करायचं आहे. उरलेल्या ५० गुणांसाठी दहावीच्या यंदाच्या अंतर्गत लेखी गुणांचे ३० गुणांत रूपांतर करायचं आहे.

अपवादात्मक परिस्थितीत जर शाळेत प्रथम सत्र किंवा सर्व परीक्षा झाल्या नसतील तर दहावीच्या अभ्यासक्रमावर आयोजित सर्व चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प, स्वाध्याय यांचं ३०पैकी गुणांत रूपांतर करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.

शाळेचा संकलित निकाल तयार करताना परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय प्राप्त गुण नोंदवावेत. सवलतीचे गुण, कला आणि क्रीडा सवलतीचे गुण नोंदवण्यात येऊ नयेत. त्यासंदर्भातील कार्यवाही राज्य मंडळाच्या स्तरावर करण्यात येईल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

त्यानुसार ३ जुलैपासून विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाच्या स्तरावरील निकालाची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे जुलैमध्ये राज्य मंडळाकडून अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा