मुंबई विद्यापीठाविरोधात न्यायालयात याचिका


SHARE

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा सेमिस्टर एक आणि सेमिस्टर दोनच्या केटीचा निकाल तब्बल दीड वर्षे रखडवल्यानं अखेर संतप्त विद्यार्थिनीने थेट मुंबई विद्यापीठाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.


नेमकं प्रकरण काय?

जुहू येथील डी.जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नेहा चांडक या विद्यार्थिनीने २०१७ मध्ये सेमिस्टर एक आणि सेमिस्टर दोनची केटीची परीक्षा दिली होती. त्यांनतर मे महिन्यात विद्यापीठाने घेतलेल्या या परीक्षेचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला होता. मात्र आजतागायत विद्यापीठाने निकाल जाहीर केला नसल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.


अखेर न्यायालयात धाव

निकालाबाबत या विद्यार्थिनीने परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेतली. परंतु, नेहमीच टोलवाटोलवीची उत्तरं देऊन विद्यार्थिनीची तक्रार ऐकण्यास त्यांनी नकार दिला. केटीचा निकाल प्रलंबित असल्यानं या विद्यार्थिनीला सेमिस्टर सातच्या परीक्षेला बसू देण्यास कॉलेजने नकार दिला आहे. आधीच रखडलेला निकाल आणि त्यात परीक्षेला बसवण्यास कॉलेजचा नकार यामुळे विद्यार्थिनीवर आभाळ कोसळलं आहे. विशेष म्हणजे सेमिस्टर सातसाठी प्रवेश न मिळाल्यास या विद्यार्थिनीची चार वर्षे वाया जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीने अखेर न्यायालयात धाव घेतली आहे.

इतर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. पण माझा निकाल न आल्याने मी विद्यापीठाकडे त्याबाबत विचारणा केली. परंतु, अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. माझे शैक्षणिक नुकसान होणार असल्यानं याबाबत मी न्यायालयात धाव घेतली.
- नेहा चांडक, याचिकाकर्ती विद्यार्थिनी

हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं याबाबत अधिक बोलणं उचित नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या