शिक्षकांचे १३ ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषण


SHARE

मुंबई - शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील शिक्षक १३ ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषण करणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समिती, मुख्याध्यापक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ आणि शिक्षक भारतीच्या झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच आमदार कपिल पाटील हे परळच्या मैदानात आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणाला बसणार आहेत.

तसेच औरंगाबाद येथील मोर्चातील ३०० शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत आणि १०० टक्के अनुदान विनाअट द्यावे अशा मागण्यांचे ठराव या बैठकीत मांडण्यात आले. २८ ऑगस्ट २०१५ चा जीआर रद्द करावा आणि सरप्लस शिक्षकांना मूळ शाळेतच ठेवावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 'राज्यातल्या शिक्षकांचे रक्त रस्त्यावर सांडणारे आणि शिक्षकांनाच भाडोत्री गुंड ठरवणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माफी मागावी' अशी मागणीही आमदार कपिल पाटील यांनी केली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, अमोल ढमढेरे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे अध्यक्ष एस. डी. डोंगरे, तुकाराम सवादेकर, संजय पाटील, राजेंद्र प्रधान, मारुती म्हात्रे, सुदाम कुंभार यांच्यासह अनेक मुख्याध्यापक उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या