Advertisement

आयडॉलचा कोणताही अभ्यासक्रम रद्द नाही- यूजीसी


आयडॉलचा कोणताही अभ्यासक्रम रद्द नाही- यूजीसी
SHARES

यंदाच्या शैक्षणिक वर्षातील दूर व मुक्त शिक्षण देणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या यादीत मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'चं नाव नसल्यानं मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतु 'आयडॉल'चा कोणताही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेला नसल्याचं स्पष्टीकरण 'यूजीसी'मार्फत देण्यात आलं आहे.


का करावा लागला खुलासा?

ज्या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेता येत नाही किंवा नोकरी करताना शिक्षण घेता यावं यासाठी मुंबई विद्यापीठानं दूर व मुक्त शिक्षण संस्था म्हणजेच 'आयडॉल'ची स्थापना केली. या संस्थेत अनेक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवण्यात येत असून दरवर्षी सुमारे ८० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात.


विद्यार्थ्यांमध्ये भीती

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) देशातील दूर व मुक्त शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांची यादी जाहीर केली. मात्र या यादीत मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'चं नाव नसल्यानं विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षणावर टांगती तलवार उभी राहिली होती. तसचं यूजीसीनं जाहीर केलेल्या या यादीमुळं 'आयडॉल'च्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ आली होती.


आदित्य ठाकरे आक्रमक

याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत यूजीसीनं आयडॉलबाबतचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आणि चुकीचा आहे. तसचं यूजीसीचा निर्णय रद्द करून मुंबई विद्यापीठाचा 'आयडॉल'चा विभाग सुरू ठेवला पाहिजे. अशी मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडं केली होती.


यूजीसीचा खुलासा

या प्रकरणावर सोमवारी १३ ऑगस्टला विद्यापीठ अनुदान आयोगाचं पत्र मुंबई विद्यापीठाला प्राप्त झालं. त्यात मुक्त विद्यापीठांच कोणतेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नसून विद्यापीठातील अभ्यासक्रमात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटी भरून काढण्यासाठी विद्यापीठाला एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. तसंच यासंबंधित अधिक माहिती येत्या १६ ऑगस्ट रोजी यूजीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या या पत्रामुळं 'आयडॉल'मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा