Advertisement

सर्जिकल स्ट्राईक दिन पाळा, यूजीसीचे काॅलेज, विद्यापीठांना आदेश

दहशतवाद्यांवर जरब बसवणाऱ्या या सर्जिकल स्ट्राइकचं देशभरात कौतुक झालं. भारतीय जवानांच्या या यशाची आठवण म्हणून विद्यापीठात हा दिवस साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.

सर्जिकल स्ट्राईक दिन पाळा, यूजीसीचे काॅलेज, विद्यापीठांना आदेश
SHARES

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस 'सर्जिकल स्ट्राईक दिन’ म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत. या दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचं संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचं आयोजन तसंच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छापत्रं पाठविण्यात यावीत, असं यूजीसीनं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.


यशाची आठवण म्हणून

२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ७ तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. विशेष दलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं. त्या संदर्भातील व्हिडिओही काही महिन्यांपूर्वी जारी करण्यात आला होता. दहशतवाद्यांवर जरब बसवणाऱ्या या सर्जिकल स्ट्राइकचं देशभरात कौतुक झालं. भारतीय जवानांच्या या यशाची आठवण म्हणून विद्यापीठात हा दिवस साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.


विशेष परेड 

 यूजीसीनं सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना नुकतचं याबाबतचं पत्र पाठवलं असून यात सर्व विद्यापीठांतील एनसीसीच्या कॅडेट्सना २९ सप्टेंबर रोजी विशेष परेड घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परेडनंतर एनसीसीचं कमांडर सीमेच्या संरक्षणासंबंधी या कॅडेट्सना संबोधीत करतील, असंही त्यात नमूद केलं आहे. त्याशिवाय दिल्लीतील राजपथावरील इंडिया गेटजवळ २९ सप्टेंबर रोजी एका दृकश्राव्य प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य, केंद्रशासित प्रदेश, महत्त्वाची शहरं, देशातील लष्करी छावण्यांमध्येही प्रदर्शनं भरवली जाणार असून ही प्रदर्शनं विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणारी असावीत, असंही या पत्रात म्हटलं आहे.



हेही वाचा - 

रूस्तमजी शाळेचा मनमानी कारभार, फी दरवाढीचा पालकांना त्रास

'लाॅ' अभ्यासक्रमावर तोडगा निघणार? विशेष बैठकीचं आयोजन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा