Advertisement

विद्यापीठाच्या ग्रंथालयासाठी ३ कोटीचा खर्च, सुविधांच्या नावाने मात्र बोंब


विद्यापीठाच्या ग्रंथालयासाठी ३ कोटीचा खर्च, सुविधांच्या नावाने मात्र बोंब
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील राजाबाई टॉवर येथे ग्रंथालयाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याशिवाय सध्या या ग्रंथालयात आवश्यक अशा कोणत्याही सोयी सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याच ग्रंथालयाच्या दुरूस्ती व विविध सुविधांसाठी ३ कोटी, ८७ लाख, ५४ हजार ४२२ रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारन्वये उघड झाली आहे.


आरटीआयअंतर्गत मागवली माहिती

लॉचे शिक्षक आणि एम फिलचे विद्यार्थी शोमितकुमार साळुंखे यांनी माहिती अधिकार कायदा २००५ (आरटीआय) नुसार १३ जुलै रोजी फोर्ट कॅम्पसमधील ग्रंथालयातील वार्षिक खर्चाची प्रत मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे मागवली होती. त्यात सप्टेंबर २०१३ ते मे २०१५ पर्यंतच्या वार्षिक देखभाल आणि दुरूस्ती खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार खर्च, पुस्तक खरेदी खर्चाची तपशीलवार माहिती देण्यात यावी, असं नमूद करण्यात आलं होतं.


३ कोटी ८७ लाखांचा खर्च

आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०१३ ते २ ऑगस्ट २०१४ या वर्षात विद्यापीठानं ग्रंथालयाच्या दुरूस्ती, देखभाल, व जीर्णोद्धारासाठी एकूण ३ कोटी, ८७ लाख, ५४ हजार, ४२२ रूपये एवढी रक्कम खर्च केल्याचं उघड करण्यात आलं आहे. त्यानुसार शोमित १८ जुलै २०१८ ला जून २०१७ ते जून २०१८ या दरम्यानची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडं मागवली होती. 


पुस्तक खरेदीसाठी इतका खर्च

या संदर्भातल्या माहिती अधिकाऱ्याच्या प्रतीमध्ये विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या देखभाल आणि कर्मचारी खर्चाच तपशील उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं असून एकूण पुस्तक खरेदीसाठी ६१ हजार ०३७ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसचं कर्मचारी पगार खर्च, देखभाल व दुरूस्ती खर्चाचं वर्गीकरणाचा तपशीलही उपलब्ध नसल्याची माहिती आरटीआय प्रतीत देण्यात आली आहे.


विद्यार्थी त्रस्त

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये राजाबाई टॉवर इथं विद्यापीठाचे ग्रंथालय असून या ग्रंथालयाचा नियमित वापर लॉ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह, इतर विद्यार्थीही नियमित करत असतात. मात्र या ग्रंथालयात अनेक टेबल आणि खुर्च्या मोडकळीस आल्या असून फक्त चारच पंखे असल्यानं विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून अभ्यास करावा लागत आहे.

त्याशिवाय विद्यापीठात ग्रंथालयात कोणत्याही प्रकारची इंटरनेटची सुविधा नसून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेले नाहीत. इतकंच नाही तर विद्यापीठातील ग्रंथालयात अनेक ठिकाणी विविध वायर्स अशाच ठेवण्यात आल्या असून यामुळे कोणतीही दुर्घटना घडू शकते. या सर्व समस्या लवकरात सोडवण्यात याव्या, अशी मागणी अनेक विद्यार्थी करत आहेत.

मुंबई विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परंतु, सध्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुरवस्था झाली आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला वारंवार तक्रार केली होती. परंतु, या तक्रारीची दखल विद्यापीठ प्रशासन घेत नसल्यानं मी आरटीआयद्वारे मागवली होती. त्यानुसार विद्यापीठानं ३ कोटीपेक्षा जास्त खर्च ग्रंथालयसाठी केला असला तरी विद्यार्थ्यांना मात्र अपुऱ्या सुविधात अभ्यास करावा लागत आहे.
- शोमित साळुंखे, एमफिलचे विद्यार्थी

याबाबत 'मुंबई लाइव्ह'नं विद्यापीठ डॉ. लीलाधर बनसोडे उप कुलसचिव जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा