Advertisement

आयडॉलच्या मान्यतेची प्रक्रिया अद्याप सुरू, विद्यापीठाचा खुलासा


आयडॉलच्या मान्यतेची प्रक्रिया अद्याप सुरू, विद्यापीठाचा खुलासा
SHARES

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई विद्यापीठामार्फत दूर व मुक्त शिक्षण देणाऱ्या आयडॉलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) कडून आयडॉलची मान्यता रद्द करण्यात आली नसून अद्याप मान्यतेची प्रक्रिया सुरू असल्याचं खुलासा विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेकडून करण्यात आला आहे. 


टांगती तलवार 

काही कारणांनी ज्या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेता येत नाही, किंवा काही जण नोकरी करताना शिक्षण घेता यावं यासाठी मुंबई विद्यापीठानं दूर व मुक्त शिक्षण संस्था म्हणजेच आयडॉलची स्थापना केली. या संस्थेत अनेक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवण्यात येत असून दरवर्षी सुमारे ८० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र युजीसीकडून ऑगस्ट महिन्यात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील दूर व मुक्त शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचं नाव नसल्यानं विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षणावर टांगती तलवार उभी राहिली होती. 


पत्रक जाहीर 

६ सप्टेंबरला युजीसीकडून अभ्यासक्रमांची माहिती देणारे पत्रक जाहीर करण्यात आलं होतं. त्यात यूजीसीच्या परवानगीशिवाय आयडॉलमध्ये बॅफ, बी. कॉम (अकाऊंटिंग ॲण्ड फायनान्स) - प्रथम वर्ष आणि मोड्युलर प्रोग्राम्स इन इंडियन म्युझिक यांसारखे अनेक अभ्यासक्रम सुरू असल्याचं उघडकीस आलं होतं.


नियमामध्ये सुधारणा 

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेकडून देण्यात आलेल्या खुलासानुसार, युजीसीनं जून २०१७ साली दूरस्थ शिक्षणासाठी नवीन नियमावली जाहीर केली असून भारतातील प्रत्येक दूरस्थ शिक्षण संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वतंत्रपणं मान्यता घेणं आवश्यक आहे. त्यानंतर युजीसीनं ६ सप्टेंबर २०१८ रोजी दूरस्थ शिक्षणाच्या नियमामध्ये तिसरी सुधारणा केली असून यात नॅकसाठी काही विद्यापीठांना शिथिलता देण्यात आली असून २०१९-२० या शैक्षणिक वर्षात नॅक मूल्यांकन करता येईल असं सांगण्यात आलं आहे. 


पुर्नप्रस्ताव युजीसीकडे 

त्यानुसार आयडॉलच्या मान्यतेसाठी ५ ऑक्टोबर २०१८ रोजी पुर्नप्रस्ताव युजीसीकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान या प्रस्तावाची छाननी करण्याचं काम सुरू असून लवकरच युजीसीकडून याबाबतच उत्तर अपेक्षित आहे. त्यामुळ विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) कडून आयडॉलची मान्यता रद्द करण्यात आली नसून अद्याप मान्यतेची प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्टीकरण आयडॉलकडून देण्यात आलं आहे.



हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठात हिप-पॉप अभ्यासक्रम

विक्रोळीतील महापालिका शाळेत कुत्र्या-मांजराचा वावर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा