मागील काही महिन्यांपासून प्रत्येकाच्या मुखात एकच नाव आहे, ते म्हणजे शेवंता... 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळं पुन्हा प्रकाशझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकरने साकारलेल्या शेवंताच्या या मालिकेनं नुकतीच सेंच्युरी ठोकली आहे.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत अपूर्वा नेमळेकर साकारत असलेली शेवंता चांगलीच पॅाप्युलर झाली आणि त्याचा मालिकेलाही चांगलाच फायदा झाला. पहिल्या पर्वाच्या यशानंतर झी मराठीवर सुरू असलेल्या 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. उत्कंठावर्धक वळणांच्या कथानकामुळं मालिकेत पुढे काय घडणार याचं कुतूहल प्रेक्षकांना असतं आणि घराघरात त्याचीच चर्चा सुरू असते. याच लोकप्रियतेच्या बळावर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं १०० भागांचा टप्पा गाठला आहे.
शतकी वाटचालीचा आनंद संपूर्ण टीमनं मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी 'रात्रीस खेळ चाले २' मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. संपूर्ण टीम जिच्यामुळे ही मालिका यशस्वीरित्या १०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले गेले. आभारप्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून साजरा केला आणि या यशाच्यामागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही.
प्रेक्षकांच्या लाडक्या शेवंता म्हणजेच अपूर्वानं आपल्याला मिळालेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. मालिकेतील इतर कलाकारांनी सांगीतलं की, कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या व्यक्तिरेखांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच मालिकेत काशीचा अपघाती मृत्यू झाला आहे. आता पुढं काय होणार? वच्छी काशीचा मृत्यू मान्य करणार का? अण्णांना भिवरी आणि तातू सारखं काशीचं अस्तित्व जाणवणार का? हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.
हेही वाचा-
'चेहरे' चित्रपटातील अमिताभ यांचा फर्स्ट लूक पाहिलात का?
इम्रान हाश्मी-अमिताभ पहिल्यांदाच एकत्र