Advertisement

'कुटुंब रंगलय काव्यात' चा ३००० वा प्रयोग


'कुटुंब रंगलय काव्यात' चा ३००० वा प्रयोग
SHARES

गेली ३८ वर्षे काव्याची गंगा अविरतपणे रसिकांसमोर घेऊन येणाऱ्या विसूभाऊ बापट यांच्या मुकुटात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अविरत प्रतिष्ठान आणि क्वॉलिटी ट्रॅव्हल वर्ल्ड प्रस्तुत 'कुटुंब रंगलय काव्यात' या काव्यरसाने परिपूर्ण कार्यक्रमाचा ३००० वा प्रयोग रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत नुकताच शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये संपन्न झाला. 


रसिक मंत्रमुग्ध 

रविकिरण मंडळाच्या कवितांपासून ते नवकवितांचा प्रवाह कसा बदलत गेला हे सांगत, गीत-संगीताच्या माध्यमातून कवितांचा हा प्रवास विसुभाऊंनी उलगडत नेला. नाट्यसंगीत, भावगीतं, भक्तीगीतं, देशभक्तीपर गीतं, अंगाई, बडबड गीतं, चारोळ्या, गझल, संतरचना, पंतकाव्य, सवाल-जवाब अशा विविध काव्यप्रकारांचा नजराणा सादर करून विसुभाऊंनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पत्रकारांच्या उपस्थितीत काव्याचा हा जागर पार पडला. 


एकपात्री प्रयोग

'कविता' हा एकमेव विषय घेऊन गेली ३८ वर्ष विसुभाऊ 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही फिरत आहेत. आता इथेच न थांबता विसूभाऊंनी 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री प्रयोगाचे जास्तीत जास्त प्रयोग करावेत, अनेक ज्ञात-अज्ञात कवितांचा खजिना रसिकांसाठी घेऊन यावा अशी इच्छा व्यक्त करत उपस्थितांनी विसुभाऊ आणि त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.


पंधरा तास कार्यक्रम

'कुटुंब रंगलाय काव्यात'चे ३००० प्रयोग होणं हे माझं भाग्य असून रसिकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादांमुळे मी हा  टप्पा पार करू शकल्याचं विसुभाऊ म्हणाले. आजवर सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. यापुढेही हा स्नेह असाच वृद्धिंगत होत राहावा, अशी कृतज्ञतापूर्ण भावनाही विसुभाऊंनी व्यक्त केली. विशेष म्हणजे केवळ दोन तासांपुरता कार्यक्रम न करता तेरा आणि पंधरा तास सलग कवितांचा कार्यक्रम सादर करण्याचा विक्रम विसुभाऊंच्या नावावर आहे. यात ते एकही कविता रिपीट करीत नाहीत हे विशेष. आजच्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांसोबतच कॅालेजवयीन तरुणाईनेही अशा प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर मराठी भाषेचं वैधव आणि कवितेतील सौंदर्य त्यांना अनुभवता येऊ शकेल.



हेही वाचा- 

मोबाइल प्रेमींचं लक्ष वेधणार ‘व्हॉट्सॲप लव’!

असंतोषाविरोधात मराठीतील दिग्गजांचा 'आसूड'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा