Advertisement

सागर देशमुख साकारणार पुलं


सागर देशमुख साकारणार पुलं
SHARES

नाटकांसोबतच सिनेमांमध्येही अभिनय करणारा अभिनेता सागर देशमुख हा महेश मांजरेकरांच्या ‘भाई’ या सिनेमात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडेंच्या भूमिकेत दिसणार आहे.

निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकरांच्या ‘भाई’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. राज ठाकरे यांनी क्लॅप दिल्यानंतर पुलंच्या भूमिकेतील सागर देशमुख आणि सुनीताताईंच्या रूपातील इरावती हर्षे यांचा लुक रिव्हील करण्यात आला.



पुलंच्या आठवणीतील सांगितीक मैफल

पुलंच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ‘भाई’च्या सिनेमाची घोषणा करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या गाण्यांनी करण्यात आली. या छोटेखानी मैफिलीत गायिका मधुरा कुंभार यांनी ‘नाच रे मोरा...’, तर गायक-संगीतकार अजित परबने ‘इंद्रायणी काठी...’ हे गाणं गायलं.


व्यक्ती की वल्ली

पुलंनी लिहिलेली 'व्यक्ती आणि वल्ली' ही कादंबरी खूप गाजली आहे. हा सिनेमा या कादंबरीवर आधारित नसून पुलंमधील व्यक्ती आणि वल्ली समोर आणणारा आहे. त्यामुळेच या सिनेमाच्या शीर्षकापुढे 'व्यक्ती की वल्ली' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. हा पूर्णपणे पुलंचा जीवनप्रवास दाखवणारा सिनेमा असल्याचं मांजरेकरांनी सांगितलं.


मतकरी पिता-पुत्रांचं लेखन

पुलंचा सहवास लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. चित्रपट समीक्षक व लेखक म्हणून ओळखला जाणारा मतकरींचा चिरंजीव गणेशने 'भाई'ची पटकथा लिहिली आहे.


लार्जर दॅन लाईफ भूमिका

पुलंची भूमिका साकारणं हे आपल्यासाठी लार्जर दॅन लाईफ असल्याचं मत शीर्षक भूमिकेतील सागर देशमुखने व्यक्त केलं. आजवर फार कमी वेळा पडद्यावर दिसलेल्या सुनीताताईंचं व्यक्तिमत्व साकारणं हे एक वेगळंच आव्हान असल्याचं इरावती हर्षे मानते.


विक्रम गायकवाडांच्या हातांची जादू

भारतीय सिनेसृष्टीत प्रोस्थेटिक्स मेकअपमध्ये हातखंडा असलेल्या विक्रम गायकवाड यांच्या जादूई स्पर्शाने सागरला पुलंचा लुक देण्यात आला आहे. या सिनेमासाठी गायकवाड यांनी पुलंच्या चार-पाच लुक्सवर काम केल्याचं सांगितलं. 'भाई'च्या निमित्ताने एका नव्या आव्हानाचा सामना करण्याची संधी लाभली आहे.


ठाकरेंच्या चित्रांचं प्रदर्शन

आपल्यालाही पुलंच्या कादंबरीतील व्यक्तिरेखा कागदावर रेखाटण्याचा मोह झाल्याची भावना 'भाई'ची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यात पुलंच्या नजरेतील मुख्य व्यक्तिरेखांच्या जोडीला आजूबाजूच्या इतर व्यक्तिरेखाही पाहायला मिळतील असं ठाकरे म्हणाले. वर्षभरानंतर या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याचा मानस असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.



हेही वाचा -

Exclusive: ४ वर्षे होतात कुठे ? लता नार्वेकरांची विनोद तावडेंवर आगपाखड

बिग बाॅस : भूषण, शर्मिष्ठा, स्मिता नॅामिनेट



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा