Advertisement

सुमेध मुदगलकर छेडणार रोमँटिक सूर


सुमेध मुदगलकर छेडणार रोमँटिक सूर
SHARES

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मांजा’ आणि यंदा आलेल्या ‘बकेट लिस्ट’ या मराठी सिनेमांद्वारे लक्ष वेधून घेणारा मराठमोळा अभिनेता सुमेध मुदगलकर सध्या हिंदी मालिका विश्वात चांगलाच गाजत आहे. ‘राधाकृष्ण’ या बिग बजेट हिंदी मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा सुमेध सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. गोड चेहऱ्याचा सुमेध आता म्युझिक अल्बममध्येही झळकरणार असल्याची माहिती मिळाली आहे.


सुमेध रोमँटिक अंदाजात

विशेष म्हणजे चॅाकलेट हिरोसारखा लूक असूनही सुमेधनं अद्याप कोणताही रोमँटिक चित्रपट केलेला नाही. प्रवाहापेक्षा वेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकांद्वारे त्याने प्रेक्षकांसह सर्वांनाच भुरळ घातली आहे. ‘मांजा’मध्ये तो नकारात्मक भूमिकेमध्ये होता, तर ‘बकेट लिस्ट’मध्ये बहिणीवर मनापासून प्रेम करणारा भाऊ बनला. नव्या येणाऱ्या अल्बममध्ये मात्र रसिकांना सुमेधचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


देखण्या आणि घायाळ करणाऱ्या लूकमुळेच सुमेधला कृष्णाची भूमिका मिळाली आहे. या मालिकेतील नायक म्हणजेच कृष्ण जरी पौराणिक हिरो असला, तरी त्याचा अंदाज रोमँटिक आहे. हाच धागा पकडून सुमेध रोमँटिक भूमिकांकडे वळत असल्याचं त्याच्या जवळील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं.

आगामी येणारा अल्बम हे त्या दिशेनं सुमेधने टाकलेलं पुढचं पाऊल असेल. या अल्बमबद्दल सध्या कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. याबाबतची माहिती हळूहळू समोर येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा