अनू मलिकने धरली मराठीची वाट

हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अनू मलिक यांचे मराठी संगीतावरही विशेष प्रेम आहे. भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि आशा भोसले ही तर त्यांची दैवतंच आहेत, पण त्याचसोबत सुधीर फडके, श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकर या प्रतिभावान गायक-संगीतकरांचेही ते चाहते आहेत.

SHARE

हिंदीतील बरेच दिग्गज आज मराठीच्या वाटेवर आहेत. काहींनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे, तर काही पदार्पणाच्या मार्गावर आहेत. यांच्याच पावलावर पाऊल ठेवत संगीतकार अनू  मलिक यांनीही मराठीची वाट धरली आहे.


आसूडला संगीत

हिंदी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर आपल्या संगीताचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेले संगीतकार अनू मलिक हे आजघडीला बाॅलिवूडमधील फार मोठं नाव आहे. आजवर बऱ्याच हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत देणारे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेते अनू मलिक 'आसूड' या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी मराठीत पाऊल ठेवलं आहे. हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


वडिलांकडून वारसा

वडील संगीतकार सरदार मलिक यांच्याकडून अनू  यांना संगीताचा वारसा मिळाला आहे. १९८० मध्ये वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी त्यांनी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. गाण्यांमध्ये तबल्याचा वैशिष्ट्यपूर्ण वापर ही अनू  यांच्या संगीताची खासियत मानली जाते. याच कारणामुळे आजही त्यांच्या गाण्यांवर तरूणाई फिदा आहे. 'बॉर्डर', 'बाजीगर', 'विरासत', 'रेफ्युजी', 'बादशहा', 'जुडवाँ', 'मै हूँ ना', 'शूट आउट अॅट वडाला', 'दम लगाके हैशा', 'यमाला पगला दिवाना या चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. 'उँची है बिल्डींग...', 'गरम चाय की प्याली हो...', 'जानम समझा करो...', 'ज्युली ज्युली...', 'मै खिलाडी तू अनाडी...' ही त्यांनी गायलेली गाणी सुद्धा सुपरहिट झाली.


मराठी संगीतावर प्रेम

हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अनू मलिक यांचे मराठी संगीतावरही विशेष प्रेम आहे. भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि आशा भोसले ही तर त्यांची दैवतंच आहेत, पण त्याचसोबत सुधीर फडके, श्रीधर फडके, हृदयनाथ मंगेशकर या प्रतिभावान गायक-संगीतकरांचेही ते चाहते आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले या मराठी कलाकारांबद्दल ही त्यांच्या मनात आदर आहे.    


हा माझा सन्मान 

अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर 'आसूड' हा चित्रपट भाष्य करत असल्याने विषयाची खोली लक्षात घेता तशाप्रकारचं संगीत देणं अपेक्षित होतं. यातील गाणी व संगीत प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणारं असून, मराठी पदार्पणाबद्दल अनू म्हणाले की,  मराठीत काम करण्यास मी उत्सुक होतो, 'आसूड' च्या निमित्ताने ही संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो. 'आसूड'साठी संगीत देणं माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. यापुढेही मला मराठी चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळेल असा विश्वासही अनू  यांनी व्यक्त केला.


शेतकऱ्यांच्या समस्यांचा विषय

या चित्रपटात एका युवकाचा व्यवस्थेविरोधातील लढा दाखवताना शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीचा, त्यांच्या समस्यांचा विषय हाताळण्यात आला आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश जळमकर, तर सहदिग्दर्शन अमोल ताळे यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश जळमकर व अमोल ताळे यांचे आहेत.हेही वाचा - 

'क्रिटिक्स चॉइस शॉर्ट फिल्म अॅवॉर्ड्स'ची घोषणा

सलमान हिंदीत बनवणार ‘मुळशी पॅटर्न’
संबंधित विषय
ताज्या बातम्या