Advertisement

EXCLUSIVE : मालवणी ‘शेवंता’ बनली भोजपुरी ‘भाभी’

‘सब कुशल मंगल’ हा चित्रपट म्हणजे एक हलकीफुलकी लव्ह स्टोरी आहे. यातील अपूर्वाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. पण ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘सब कुशल मंगल’ यांच्या शूटिंगचा ताळमेळ साधण्यासाठी अपूर्वाला तारेवरची कसरत करावी लागली.

EXCLUSIVE : मालवणी ‘शेवंता’ बनली भोजपुरी ‘भाभी’
SHARES

आज शेवंता या व्यक्तिरेखेला वेगळ्या ओळखीची गरज राहिलेली नाही. मालवणी भाषेतील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता लोकप्रिय झाली आणि हि भूमिका साकारणारी अपूर्वा नेमळेकर वन नाईट स्टार बनली. आता हीच मालवणी शेवंता भोजपुरी भाभी बनली आहे. अपूर्वा आता भोजपुरी भाभीच्या रूपात भेटणार आहे. ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना अपूर्वानं स्वत:च हे गुपित उघड केलं आहे.


प्रथमच हिंदीत

प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अपूर्वा आता हिंदी चित्रपटात झळकणार आहे. याबाबत अपूर्वा म्हणाली की, ‘सब कुशल मंगल’ या हिंदी चित्रपटाद्वारे मी प्रथमच हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर ‘दिसणार’ आहे. यापूर्वी मी ‘अक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटामध्ये ओपनिंग सीन केला होता, परंतु तो एडिटींगमध्ये कट झाल्यानं चित्रपटात असूनही मी पडद्यावर दिसले नाही. त्यामुळे ‘सब कुशल मंगल’ हा माझा पहिला हिंदी चित्रपट मानायला हरकत नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण कश्यप यांनी केलं आहे. यात माझ्या जोडीला अक्षय खन्ना, प्रियांक शर्मा, रेवा किशन, सतिश कौशिक, सुप्रिया पाठक, साहील शिवराम हे कलाकार आहेत.


कोकणी ते बिहारी

छोट्या पडद्यावरील मालवणी मालिकेत कोकणातील शेवंता साकारल्यानंतर या चित्रपटातही एक वेगळंच आव्हान होतं असं सांगत अपूर्वा म्हणाली की, मी या चित्रपटात भोजपुरी भाभीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही नायकाच्या बेस्ट फ्रेंडची पत्नी आहे. नायकाच्या पूर्ण प्रवासात, त्याच्या लव्हस्टोरीमध्ये साथ देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यातील मुख्य कॅरेक्टर्स मी आणि माझा आॅनस्क्रीन नवरा बनलेल्या साहील शिवरामनं साकारली आहे. 


भोजपुरीसाठी मेहनत

भोजपुरी भाभी बनण्यासाठी अपूर्वाला बरेच कष्ट घ्यावे लागले. याविषयी ती म्हणाली की, यात मी बिहारी गेटअपमध्ये दिसणार आहे. एखादी टिपीकल बिहारी भाभी असते, तसं हे कॅरेक्टर आहे. पहिल्यांदाच मी अशा प्रकारचं कॅरेक्टर साकारलं असून, भोजपुरी भाषाही बोलले आहे. हा चित्रपट करण्यापूर्वी मला जराही भोजपुरी भाषा येत नव्हती. रांचीमध्ये असताना तिथल्या लोकॅलिटीमध्ये फिरले, तिथल्या लोकांशी संवाद साधत त्यांची बोलण्याची शैली आत्मसात केली. मुंबईतही मी कित्येकदा टॅक्सी-रिक्षा ड्रायव्हर, पेट्रोल पंपावरील कामगार यांच्याशी भोजपुरीतच बोलायचे. त्यातून बऱ्यापैकी सराव झाल्यामुळं सेटवर काहीच अडचण भासली नाही.


तारेवरची कसरत

‘सब कुशल मंगल’ हा चित्रपट म्हणजे एक हलकीफुलकी लव्ह स्टोरी आहे. यातील अपूर्वाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. पण ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘सब कुशल मंगल’ यांच्या शूटिंगचा ताळमेळ साधण्यासाठी अपूर्वाला तारेवरची कसरत करावी लागली. याबाबत ती म्हणाली की, दोन महिने माझ्यासाठी खूप हेक्टिक होते. मुंबईहून रांची, रांचीहून गोवा आणि गोव्याहून सावंतवाडी असा एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या राज्यांमधून प्रवास करत मी ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘सब कुशल मंगल’ यांचं चित्रीकरण पूर्ण केलं. असं दोन महिन्यांमध्ये जवळजवळ पाच-सहा वेळा करावं लागलं.


अक्षयसोबतचं स्वप्न साकार

‘अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात आपण दिसलो नसल्याचं जेवढं दु:ख अपूर्वाला झालं नाही तेवढं अक्षयसोबत काम करूनही तो सीन कट झाल्याचं झालं होतं. अखेर या चित्रपटात तिचं स्वप्न साकार झालं आहे. अक्षयसोबत काम करण्याबाबत अपूर्वा म्हणाली की, त्या चित्रपटात माझा अक्षय खन्नासोबत सीन होता. नेमका तोच कट झाल्यानं खूप वाईटही वाटलं होतं. त्यामुळं अक्षयसोबत काम करण्याची इच्छा होतीच. भविष्यात कधी तरी पुन्हा एकदा मी अक्षयसोबत काम करेन, असं तेव्हाच मनाशी ठरवलं होतं. अखेर ती इच्छा ‘सब कुशल मंगल’मुळं पूर्ण झाली. 


यंदा होणार प्रदर्शित

‘भाकरखडी सात किमी’ हा अपूर्वाचा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यात तिनं एका डाॅक्टरची भूमिका साकारली होती. ‘अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये न दिसल्यानं ‘सब कुशल मंगल’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची निर्मिती नितीन मनमोहन यांची मुलगी प्राची नितीन मनमोहन यांनी केली आहे. या चित्रपटाचं दोन-तीन दिवसांचं चित्रीकरण शिल्लक आहे. त्यात गाण्यांचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. यंदा हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे.



हेही वाचा -

मॅडम सर'सोबत तरुण सलमान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा