Advertisement

स्वागत नूतन मराठी वर्षाचं…

मराठी कलाकारांनी आपल्या मनातील गुढीपाडव्याच्या विशेष आठवणी शेअर करत सर्वांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या …

स्वागत नूतन मराठी वर्षाचं…
SHARES

चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे मराठी वर्षाचा शुभारंभ. साडेतीन मुहूर्तापैकी एक. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. गुढी उभारणं आणि स्वागत यात्रांमुळं हा दिवस संस्मरणीय ठरतो. सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या दिवसाच्या खास आठवणी असतात. मराठी कलाकारांनी आपल्या मनातील गुढीपाडव्याच्या विशेष आठवणी शेअर करत सर्वांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या …


भार्गवी चिरमुले

तिथीनुसार माझी बहिण चैत्रालीचा गुढीपाडव्याला वाढदिवस असतो. त्यामुळं आमच्या घरात डबल सेलिब्रेशन असतं. गुढी उभारण्याची धावपळ आणि सोबतीला वाढदिवसाचं सेलिब्रेशन अशी धमाल दरवर्षी आमच्या घरी असते. खास बात म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून आमच्या घरी आंबा खायला सुरुवात होते. आमरस-पुरीचा खास बेत यादिवशी असतो. साडी नेसून अगदी पारंपरिक पद्धतीनं आम्ही यादिवशी सहकुटुंब गुढीची पूजा करतो. त्यामुळं या दिवसाची माझी खूप खास आठवण आहे.


चिन्मय उद्गीरकर  

माणसाच्या संकल्पनावरून आणि ध्येयावरून माणूस काय आहे ते कळत असतं त्यामुळं या दोन्ही गोष्टींना खूप महत्व आहे. गुढी पाडव्याच्या निमित्तानं नव्यानं स्वत:ला पुन्हा घडवायचं आहे. यासोबतच आनंदीही रहायचं आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो त्यामुळं आनंद शोधणं अवघड झालं आहे. त्यामुळं आनंदी रहाण्याचा प्रयत्न करणार आहे.


प्रिया मराठे

मी ठाणेकर आहे. त्यामुळं लहानपणापासून ठाण्यात साजरा होणारा गुढीपाडवा पाहात आले आहे. पहाटे निघणाऱ्या शोभायात्रा, भल्या मोठ्या रांगोळ्या, दिव्यांची आरास आणि दिमाखात झळकणारी गुढी या सर्व गोष्टी कायम स्मरणात रहाणाऱ्या आहेत. यंदाचा गुढीपाडवा यासाठी स्पेशल आहे कारण गेल्याच वर्षी मीरा रोडमध्ये बॉम्बे फ्राईज या आमच्या हॉटेलची सुरुवात झाली. यंदा एका खास मराठमोळ्या गोड मेन्यूसह आम्ही हॉटेलमध्ये गुढी उभारणार आहोत. त्यामुळं यंदाचा गुढीपाडवा मी आणि शंतनू जल्लोषात साजरा करणार आहोत


ओमप्रकाश शिंदे

पहिल्यापेक्षा उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न चालू ठेवणं हा माझा संकल्प आहे. प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्ष्याच्या खूप खूप शुभेच्छा! निर्सगाची काळजी घ्या, तो आपली काळजी घेतच असतो. या निमित्तानं एक आठवण सांगावीशी वाटते. या दिवशी माझे वडील कडुनिंबाचा पाला गुळात एकत्र करून खायला देतात. ते खाण्याची अजिबात इच्छा नसायची, पण डोळे मिटून खायचो आणि पटकन पाणी प्यायचो. हे दरवर्षी घडतं.


भाग्यश्री लिमये

गुढी उभारणं हे विजयाचं प्रतिक. आपण गुढी आकाशाच्या दिशेनं उभारतो आपली महत्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अथांग असावी असा संदेशच जणू ही गुढी देत असते. म्हणूनच यादिवशी नववर्षाचा संकल्प करायचा आणि तो वर्षभर टिकवायचा पण नेमकं हेच तर मला जमत नाही. सुरुवात जोरात होते पण पुढं पुढं कामाच्या व्यग्रतेमुळं सातत्य टिकत नाही, म्हणून यावर्षी ठरवलं आहे असा संकल्प करायचा की तो सहजपणे जमेल. रोज रात्री झोपताना उद्या काय करायचं आहे ते ठरवायचं आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्याची किती पूर्तता झाली याचा आढावा घ्यायचा. त्यामुळं विचारात, आचारात नेटकेपणा येईल आणि वेळेचं सुयोग्य नियोजनही होईल, पाहुया कसं जमतं ते!


आशुतोष कुलकर्णी

मी मुळचा पुण्याचा असल्यानं गुढीपाडव्याची विशेष आठवण आहे. माझ्या जुन्या घराला बाल्कनी नसल्यानं गुढी उभारताना फार कसरत करावी लागायची. त्यामुळं नवं घर घेताना आवर्जून मी बाल्कनी असणारं घर घेतलं. तेव्हापासून दरवर्षी जल्लोषात गुढी उभारतो. मला लहानपणी गुढीला घातल्या जाणाऱ्या बत्ताश्यांच्या माळा खायला फार आवडायचं. आता डाएटमुळं शक्य होत नाही, पण शूटिंग नसेल तेव्हा आवर्जून मी पुण्याला जाऊन आई-बाबांसोबत उत्साहात हा सण साजरा करतो.


संकेत पाठक

मागील बरीच वर्ष मी शूटिंगच्या निमित्तानं मुंबईत असल्यामुळं सेटवरच गुढीपाडवा सेलिब्रेट करतो आहे. मी मूळचा नाशिकचा आहे. तिथं माझ्या घरी गुढी दरवर्षी उभारली जाते. लहानपणी मी माझी वेगळी छोटी गुढी उभारायचो. त्या छोट्या गुढीचे छोटे दागिने, छोटी साडी हे साकारताना खूप मजा यायची. गुढीपाडव्याला आमच्याकडे गुळ-पोळीचा खास बेत असतो. आईच्या हातचा हा खास पदार्थ मी आता खूप मिस करतो.

 

 

गौरव घाटणेकर

स्टार प्रवाहसोबत अटेण्ड केलेली गिरगावची भव्यदिव्य शोभायात्रा ही माझी गुढीपाडव्याची खास आठवण आहे. ढोल-ताश्यांचा गजर, पारंपरिक वेशभूषेमध्ये सामील झालेले हजारो लोक. हे संपूर्ण वातावरणच खूप भारावून टाकणारं होतं. माझ्या आयुष्यातली ती एक अविस्मरणीय आठवण आहे. यंदा मी आणि माझी पत्नी श्रुती पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहोत. गेल्यावर्षी शूटिंगमुळं गुढीपाडवा एकत्र साजरा करणं जमलं नाही. यंदा मात्र आधीच प्लॅनिंग करुन ठेवलं आहे. त्यामुळं यंदाचा गुढीपाडवा स्पेशल असणार आहे. शिवाय ‘ललित २०५’मध्येही गुढीपाडव्याचं खास सेलिब्रेशन केलं आहे.हेही वाचा -

अजिंक्य देवच्या हस्ते ‘सिनेमा घर’चं प्रकाशन

... तर सुबोध बनणार राहुल गांधी?
संबंधित विषय
Advertisement