Advertisement

‘बेफिक्रे’ म्हणजे आदित्य चोप्राचा जोर का धक्का


‘बेफिक्रे’ म्हणजे आदित्य चोप्राचा जोर का धक्का
SHARES
Advertisement

मुंबई - दिग्दर्शक आदित्य चोप्राला मानायला हवं. काल प्रदर्शित झालेला बेफिक्रे धरून 21 वर्षात त्यानं फक्त चार चित्रपट दिग्दर्शित केलेत. (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मोहब्बते, रब ने बना दी जोडी). ‘रब ने…’ प्रदर्शित होऊन आता आठ वर्ष होऊन गेलीत. दरम्यानच्या काळात हिंदी सिनेमाच्या विषयांची, सादरीकरणाची, संगीताची...

थोडक्यात फिल्ममेकिंगच्या सर्वच अंगांची चौकट बदललीय. खुद्द आदित्य चोप्राच्या दिग्दर्शनाची एक विशिष्ट स्टाइल धरून गेली होती. त्यामुळेच बेफिक्रेचे रणवीरसिंग-वाणी कपूरचे बेधडक रोमान्स करतानाचे प्रोमो आणि फोटो पाहिल्यानंतर आदित्य चोप्रा आपला ट्रॅक बदलतोय याची कल्पना आली होती. प्रेक्षकांच्या आवडीची नस सापडलेल्या दिग्दर्शकानं आपल्या शैलीविपरीत एखादा चित्रपट करणं हे खूप धाडसाचं काम आहे. आदित्य चोप्राचं हे धाडस पडद्यावर खूप छानरीत्या उतरलंय. प्रेम नेमकं ओळखायचं कसं हा अनादी अनंत काळापासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाच चित्रपट आदित्यनं या चित्रपटातून केलाय. परंतु, आदित्यची वेगवान पटकथा, दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि रणवीरसिंग-वाणी कपूर या जोडीनं त्याला कमालीची साथ दिल्यामुळे हा बेफिक्रे छान मनोरंजन करून जातो.

धरम (रणवीरसिंग) आणि शायराची (वाणी कपूर) ही गोष्ट आहे. आदित्य चोप्रानं फ्लॅशबॅकच्या तंत्रानं ती छान खुलवलीय. धरम पॅरिसमधील आपल्या मित्राच्या क्लबमध्ये स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून कामाला लागतो. शायरा पॅरिसमध्येच टूर गाईड म्हणून काम करीत असते. या दोघांची अचानक भेट होते आणि त्यांची केमिस्ट्री जुळते. प्रेम, लग्न यावर विश्वास नसल्यामुळे दोघंही एकमेकांना समजून घेण्यासाठी ‘लिव्ह इन’चं नातं स्वीकारतात. भिन्न स्वभावामुळे घडायचं ते घडतं. दोघांचं परस्परांशी जमत नाही. मात्र आपल्या ‘ब्रेकअप’चंही ते सेलिब्रेशन करतात. या ब्रेकअपच्या धक्क्यामधून सावरण्यासाठी शायरा आयुष्यात सेटल होण्याचं ठरवते आणि अनया (अरमान रल्हन) या बॅंकरच्या गळ्यात हार घालण्याचं ती ठरवते. ते पाहून धरमसुद्धा ख्रिस्तीन या फ्रेंच तरुणीशी चतुर्भुज होण्याचं ठरवतो. एकमेकांचा हात सोडून तिसऱ्याकडेच जाण्याच्या निर्णयावर हे दोघे ठाम राहतात की एखाद्या नवीन वळणाला हे दोघे सामोरे जातात, हे प्रत्यक्ष चित्रपटामध्येच पाहायला हवं.

आदित्य चोप्रा हा खूप चांगला स्टोरीटेलर म्हणून ओळखला जातो. एखादी साधी, सरळ गोष्टही तो आपल्या खुबीनं खूप रंगवून सांगतो. ‘बेफिक्रे’मध्ये त्यानं नेमकं हेच केलं आहे. त्याशिवाय ही गोष्ट त्याच्या नेहमीच्या शैलीच्या विपरीत आहे. आदित्य चोप्राचे आजवरचे चित्रपट कौटुंबिक रुढी, परंपरा सांभाळण्याकडेच झुकले होते. परंतु, ‘बेफिक्रे’चा अख्खा श्रेयनामावलीचा भाग चुंबन दृश्यांनी व्यापला आहे. त्यानंतरही पाहणाऱ्याला दृश्यपातळीवर आणि संवादांद्वारेही अनेक धक्के बसतात. आपल्या यापूर्वीच्या सर्व चित्रपटांचे संवाद स्वतःच लिहिणाऱ्या आदित्यानं यावेळी स्वतःसोबत शरत कतारिया यांची मदत घेतली आहे. त्यामुळेच संवादांमधील पंजाबी गोडवा कमी होऊन त्याला फ्रेंच तडका मिळाला आहे. थोडक्यात आदित्यनं प्रथमच स्वतःवरीच बंधनं साफ झुगारून दिली आहेत. त्यामुळेच विषयाच्या आणि सादरीकरणाच्या पातळीवर बोल्ड असलेल्या या विषयावरून दिग्दर्शक घसरण्याची दाट शक्यता होती. मात्र आदित्यनं आपल्या अनुभवाच्या आणि कल्पकतेच्या जोरावर आपली घसरण होऊ दिलेली नाही. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये तो गंडलाय खरा. तसेच अधूनमधून चित्रपटाचा वेगही मंदावलाय. तरीदेखील एकुण परिणामात हा चित्रपट पाहणाऱ्याला छान आनंद देतो. आदित्यचे पिता यश चोप्रा यांनी प्रेक्षकांना आपल्या सर्व चित्रपटांमधून स्वित्झर्लंडची सैर घडवली होती. आदित्यनं या चित्रपटामध्ये आपल्याला पॅरिस पर्यटन घडवलंय. अर्थातच ते नेत्रसुखद आहे. विशाल-शेखरच्या संगीतानं चित्रपटाच्या कथानकाचा मूड बरोबर पकडला आहे.

आदित्यपाठोपाठ या चित्रपटात कौतुकाचा हकदार आहे तो रणवीरसिंग. बाजीराव मस्तानीमधील त्याच्या धेडगुजऱ्या अभिनयशैलीवर खूप टीका झाली होती. परंतु, या चित्रपटामधील त्यानं साकारलेला धरम अगदी फर्मास म्हणावा लागेल. धरमची ही व्यक्तिरेखा सांडच म्हणावी लागेल. अशा व्यक्तिरेखा सलमान तरुण असताना त्याच्या वाट्याला यायच्या. सलमानची जागा आता रणवीरनं घेतली आहे. धरमच्या भूमिकेतील सर्व अतरंगीपणा त्यानं पडद्यावर छान साकारला आहे. धरमची वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा आणि रणवीरनं तिला ज्या पद्धतीनं जिवंत केलं, ते पाहता वाणी कपूरच्या वाट्याला फार काही येणार नाही, असंच वाटलं होतं. परंतु, या चित्रपटामधील तिचीही कामगिरी रणवीरप्रमाणेच दे धक्का प्रकारात मोडणारी आहे. अंगप्रदर्शनाबरोबरच आपण छान अभिनय करू शकतो, हे तिनं दाखवून दिलंय. स्वतःच्या शैलीची चौकट मोडण्याचं धाडस दाखवणाऱ्या आदित्यच्या या बदललेल्या ट्रॅकचं स्वागत करायला हवं.

संबंधित विषय
Advertisement