Advertisement

ना 'खान'दान, ना 'कपूर अॅण्ड सन्स', भोजपुरी सिनेमाच मुंबईतील सिंगलस्क्रीनचा तारणहार!

भोजपुरी सिनेमांच्या जोरावर सिंगलस्क्रीनचा धंदा जोरात सुरू आहे. होय हे खरं आहे... ना 'खान'दानीची गरज ना 'कपूर अॅण्ड सन्स'चा आधार मुंबईतल्या भोजपुरी सिनेमाच सध्या ठरत आहे, सिंगलस्क्रीन सिनेमागृहाचा तारणहार.

ना 'खान'दान, ना 'कपूर अॅण्ड सन्स', भोजपुरी सिनेमाच मुंबईतील सिंगलस्क्रीनचा तारणहार!
SHARES

संजय लिला भन्साळी यांचा मल्टीस्टारर (दीपिका, रणवीर, शाहिद) सिनेमा 'पद्मावत' असंख्य वादविवादानंतर मल्टिप्लेक्समध्ये गर्दी खेचू लागला आहे. तत्पूर्वी सिनेमाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना घाबरून आपल्या सिनेमागृहाच्या काचा फुटू नयेत, म्हणून काही सिनेमागृहाच्या मालकांनी हा सिनेमा लावण्याकडे पाठ फिरवली. कमाई करून देणारा सिनेमा असला, तरी तोडफोडीच्या भीतीने नुकसान सहन करण्यापलिकडे या सिनेमागृहांजवळ दुसरा पर्यायही नाही. पण सिंगलस्क्रीन सिनेमागृहाच्या मालकांना मात्र ही चिंता नाही, कारण भोजपुरी सिनेमांच्या जोरावर त्यांचा धंदा जोरात सुरू आहे. होय हे खरं आहे... ना 'खान'दानीची गरज ना 'कपूर अॅण्ड सन्स'चा आधार मुंबईतल्या भोजपुरी सिनेमाच सध्या ठरत आहे, सिंगलस्क्रीन सिनेमागृहाचा तारणहार.

भारतात मल्टिप्लेक्सचं आगमन झाल्याने सिंगलस्क्रीनला उतरती कळा लागली. सध्या मुंबईत सिंगलस्क्रीनची आवस्था फारशी बरी नाही. मुंबईत एका मागून एक सिनेमागृह बंद होताहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकतंच बंद पडलेलं 'शारदा सिनेमागृह'. येत्या ५ वर्षांत मुंबईतील सर्व सिंगलस्क्रीन सिनेमागृह बंद होतील, असं भाकीत जाणकारांनी वर्तवलं आहे. तोपर्यंत तग धरून ठेवण्यासाठी उरलेल्या सिंगलस्क्रीन सिनेमागृहांनी भोजपुरी सिनेमाचा पर्याय निवडला आहे. तर उरलेल्या सिनेमागृहांनी नूतनीकरणाचा मार्ग अवलंबला आहे.



'या' सिनेमागृहांना 'न्यू लूक'

मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या लक्झरिअस फिलिंगमुळे बहुसंख्य प्रेक्षक सिंगलस्क्रीनकडे पाठ फिरवत असल्याने आता सिंगलस्क्रीन मालकांनी आपापल्या सिनेमागृहांचं नूतनीकरण करून त्यांना 'न्यू लूक' देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार प्लाझा, चित्रा, मराठा मंदीर या सिनेमागृहांना नवी झळाळी मिळाली आहे.



तर, नाझ, अप्सरा, नॉव्हेल्टी, स्वस्तिक, नवरंग अशा अनेक हेरिटेज सिनेमागृहांनी कात टाकली आहे. राज्यभरातील १२०० सिंगलस्क्रीन सिनेमागृहांपैकी केवळ ५०० सिंगलस्क्रीन सिनेमागृह नियमितपणे सुरू आहेत. तर मुंबईत एकून ८० सिनेमागृह भोजपुरी सिनेमाच्या आधाराने वाटचाल करत आहेत.



कुठे? कुठले सिनेमे?

सद्यस्थितीत लोअर परळच्या न्यू शिरीन सिनेमागृहान 'नथुनीया पे गोली मारे २', कुर्ल्यातील आकाश सिनेमागृहान 'नथुनीया पे गोली मारे २' लालबागच्या जय हिंद मुक्ता ए २ सिनेमागृहात 'चल मन जितवा जैये' आणि भायखळच्या पॅलेस सिनेमागृहात देखील 'नथुनीया पे गोली मारे २' हा सिनेमा लागला आहे.



'हे' स्टार्स गाजवताहेत पडदे

सिंगलस्क्रीन सिनेमागृहाकडे हिंदी आणि मराठी सिनेमे बघणाऱ्या प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने आपलं सिनेमागृह वाचवण्यासाठी सिंगलस्क्रीन मालकांनी भोजपुरी प्रेक्षकांना जवळ केलं आहे. त्यामुळे भोजपुरी सिनेमाला हाऊसफुल्लच्या पाट्या लागत आहेत.

ज्या सिंगलस्क्रीनचे पडदे पूर्वी दिलीप कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र अशा सुपरस्टार्सनी गाजवले. त्या सिंगलस्क्रीनचे पडदे रवी किशन, मनोज तिवारी, निरहुआ, केशरी लाल यादव, पवन सिंग यांसारखे भोजपुरी स्टार्स गाजवत आहेत.

त्यामुळे एकेकाळी सुवर्णकाळ गाजवणाऱ्या या सिनेमागृहांची ओळख आता भोजपुरी सिनेमागृह म्हणून होऊ लागली आहे. प्रामुख्याने दादर, वांद्रे, भायखळा इथल्या सिनेमागृहांत भोजपुरी सिनेमे झळकत आहेत.



'इथं' बिघडलं गणित

देशात मल्टिप्लेक्सचं आगमन झालं त्यावेळी सरकारने मल्टिप्लेक्स सिनेमागृहांना पुढील ५ वर्षे टॅक्स माफ केला होता. मल्टिप्लेक्स सिनेमागृहाचं मार्डन रूप, तिथलं सुशोभीकरण, एकाच छताखाली अनेक सिनेमे बघण्याच्या सोयी यामुळे आपसूकच प्रेक्षकवर्ग मल्टिप्लेक्सकडे ओढला गेला आणि सिंगलस्क्रीनला घरघर लागली.


प्रत्येक 'शो' मागे नुकसान

सिंगलस्क्रीन सिनेमागृह मालकांनीही सरकारकडे टॅक्स माफिची मागणी केली. परंतु त्यांची मागणी मान्य झाली नाही, असं 'सिनेमा ओनर्स अॅण्ड असोसिएशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले. एका सिंगलस्क्रीनची क्षमता ७०० ते ८०० प्रेक्षकांची असते. मात्र प्रत्येक 'शो' हाऊसफूल होताेच असं नाही, त्यामुळे प्रत्येक 'शो' मागे सिंगलस्क्रीन सिेनेमागृह मालकांनाा नुकसान सहन करावं लागतं.

त्याउलट मल्टिप्लेक्स सिनेमागृहांची आसना क्षमता कमी असते. मात्र एकाचवेळी दोन ते तीन सिनेमे लागलेले असल्याने, प्रेक्षक आपापल्या आवडीनुसार सिनेमे बघतात, त्यातून एकत्रितरित्या त्यांना बऱ्यापैकी नफा मिळतो. सिंगलस्क्रीनचं नुकसान थांबवण्यासाठी सिंगलस्क्रीन सिनेमागृहाच्या मालकांनी सरकारकडे २ ते ३ स्क्रीनची परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी सरकारने नाकारल्याचंही दातार यांनी सांगितलं.



नफ्यातही मोठा फरक

एखादा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला तरी त्यातून सिनेमागृह मालकांना मिळणारा नफा वेगवेगळा असतो. विविध सिनेमांच्या एकत्रित नफ्याचा विचार करता प्रत्येक 'शो' मागे मल्टिप्लेक्स मालकांना ४५ ते ५० टक्के नफा मिळतो. तर दुसरीकडे एकाच सिनेमामुळे सिंगलस्क्रीनला १० ते १५ टक्के नफा मिळतो. एवढी मोठी तफावत या नफ्यात आढळते.



'पायरसी'चा मोठा धोका

एखादा सिनेमा प्रदर्शित झाला की पुढच्या दोन दिवसांत तो प्रेक्षकांच्या मोबाईलवर येतो. यामुळे मोठया प्रमाणावर प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्यास निरूत्साही असतो. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन एका सिनेमासाठी १५० ते ४०० रूपये खर्च करण्यापेक्षा मोबाईल चित्रपट बघण्यात आजचे प्रेक्षक समाधान मानतात. तर मल्टिप्लेेक्सच्या तुलनेत सिंगलस्क्रीनचे तिकीट हे अत्यंत कमी असतं. त्यामुळे कामगार वर्ग, उत्तरप्रदेश बिहारमधून आलेल्या प्रेक्षक भोजपुरी सिनेमाला प्राधान्य देतात. त्यामुळे या लोकांची भोजपुरी सिनेमाला मोठी गर्दी होते, असं नितीन दातार म्हणाले.


सिंगलस्क्रीनचा लढा मागील १५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र आद्ययावत तंत्रज्ञान या लढ्याला मारक ढरत आहे. जीएसटीचाही नफ्यावर मोठा परिणाम जाणवत आहे. सिंगलस्क्रिनचं बॉक्स ऑफिसवरचं कलेक्शन घटलं आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत मुंबईतील सिंगलस्क्रीन सिनेमागृह बंद पडले तर नवल वाटायला नको. सिंगलस्क्रीनकडे बघण्याची मानसिकताही प्रेक्षकांनी बदलली पाहिजे.

- योगेश मोरे, व्यवस्थापक, प्लाझा सिनेमा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा