Advertisement

नितीन देसाईंच्या एन.डी.स्टुडियोत सिनेमाची कार्यशाळा


नितीन देसाईंच्या एन.डी.स्टुडियोत सिनेमाची कार्यशाळा
SHARES

‘बॉलिवूड थीमपार्क’ म्हणून नावारूपास आलेल्या कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडियोची व्याप्ती आता खूप वाढली आहे. महाराष्ट्रातील एक पर्यटन स्थळ बनलेल्या या स्टुडिओत आता सिनेमाची कार्यशाळा भरणार आहे.

नितीन देसाई यांनी वाढदिवसाचं औचित्य साधत ‘फर्स्ट कट’ या फिल्म अॅकॅडमीची घोषणा केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगपती निरंजन हिरानंदानी, ज्येष्ठ निर्माते-लेखक-दिग्दर्शक एन. चंद्रा, प्राध्यापिका मंजू निचानी, सिनेदिग्दर्शक केतन मेहता आणि पत्रकार राजीव खांडेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत देसाईंनी ‘फर्स्ट कट’ची घोषणा केली.


'या' विषयांवर भरणार वर्ग

निरंजन हिरानंदानी यांच्या हिरानंदानी इंस्टीट्युट ऑफ लर्निंगसोबत नितीन चंद्रकात देसाई, यांच्या फिल्मी दुनियेत ‘फर्स्ट कट’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर फिल्म आणि मीडिया अकादमी उभारली जाणार आहे. देसाईंच्या संकल्पनेतून आकाराला येणाऱ्या या अॅकॅडमीमध्ये एन. चंद्रा यांचा मोलाचा वाटा राहणार आहे. सिनेसृष्टीत करियर करू इच्छीणाऱ्या होतकरू तरुण-तरुणींसाठी कथा-पटकथा, संकलन, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, वेशभूषा, दिग्दर्शन, निर्मिती तसेच इवेंट मॅनेजमेंट इत्यादी विषयांवर या कार्यशाळेत वर्ग भरवले जाणार आहे.


कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात देसाई यांच्या ‘ड्रीम ऑफ बॉलिवूड’ आणि ‘ड्रीम गर्ल ऑफ बॉलिवूड’ या आगामी कार्यक्रमाचीदेखील घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध केलं जाणार आहे.


आघाडीच्या कलाकारांच्या चित्रपटांचा समावेश

हिंदीपासून मराठी भाषेतील बऱ्याच गाजलेल्या सिनेमांचं चित्रीकरण एन. डी. स्टुडिओमध्ये करण्यात आलं आहे. यात सलमान खानपासून ऋतिक रोशनपर्यंत बॅालिवूडमधील बऱ्याच आघाडीच्या कलाकारांच्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘स्लमडॅाग मिलेनियर’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमासोबतच ‘बालगंधर्व’, ‘फर्जंद’ या मराठी सिनेमांचं तसंच ‘राजा शिवछत्रपती’ या गाजलेल्या मालिकेचं शूटिंगही एन. डी. स्टुडिओमध्ये झालं आहे.


नवोदित कलावंतांसाठी दिशादर्शक

भारतीय चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेची रंजक सफर घडवून आणणाऱ्या या फिल्मी दुनियेत, समरसून जाण्याची संधी प्रेक्षकांनाही मिळत आहे. ही बॉलीवूड नगरी अनेक कलाकारांसाठी स्वप्नपूर्तीचं केंद्र ठरत असून, चित्रपटसृष्टीत काम करू इच्छीणाऱ्या नवोदित कलावंतांसाठी ही कार्यशाळा दिशादर्शक ठरणारी आहे.


हेही वाचा - 

‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव कऱ्हाडेंचा ‘हैद्राबाद कस्टडी’

अभिनयासाठी ताजमधील नोकरीला ‘तिने’ ठोकला रामराम

संबंधित विषय
Advertisement