Advertisement

अशीही एक स्मिता...!


अशीही एक स्मिता...!
SHARES

स्मिता आणि मी... मी आणि स्मिता... गेले एक महिना स्मिता माझ्यासोबत वावरत होती. खरंतर होती म्हणण्यापेक्षा अजूनही वावरत आहे म्हणायला काही हरकत नाही. तिचे चित्रपट, तिनं साकारलेल्या भूमिका या आठवणी मनाच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत. स्मिता पाटील. तरतरीत चेहरा, पाणीदार आणि भावस्पर्शी डोळे, स्मित हास्य अशी स्मिता यांची ओळखस्मिता यांची ओळख शब्दात मांडता येणं कठीणच. कारण शब्दांच्याही पलिकडे आहेत स्मिता. केवळ ३१ वर्षांच्या असाताना स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला होता. १३ डिसेंबर १९८६ रोजी मुलगा प्रतिकच्या जन्मानंतर त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रतिभावंत अभिनेत्रीचा आज १४ डिसेंबरला डेथ अॅनिव्हर्सरी आहे. त्यांचं अचानक निघून जाणं हे धक्कादायकच होतं.



बॉलिवूडमधील संवेदनशील कलाकारांमध्ये स्मिता पाटील यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. छोट्याशा करिअरमध्ये त्यांनी ८० हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं. 'निशान्त', 'चक्र', 'मंथन', 'भूमिका', 'गमन', 'आक्रोश', 'अर्थ', 'बाजार', 'मंडी' असे व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीनं अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती.  


स्मिता ठरवून अभिनेत्री नाही झाली!

१७ ऑक्टोबर १९५५ रोजी स्मिता यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांचे वडील शिवाजी राय पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, तर त्यांच्या आई समाजसेविका होत्या. स्मिता यांनी केवळ १६ वर्षांच्या असताना न्यूज रिडर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. चित्रपट निर्माता श्याम बेनेगल यांची नजर स्मिता यांच्यावर पडली. श्याम बेनेगल यांनी 'चरण दास चोर' चित्रपटात काम करण्याची ऑफर स्मिता यांना दिली. त्यानंतर स्मिता यांनी अनेक चित्रपट केले.



राज बब्बर यांच्यासोबत स्मिता लिव्ह इनमध्ये

स्मिता यांचे वैयक्तिक आयुष्य फार चर्चेत राहिले. भिगी पलकेच्या सेटवर राज बब्बर आणि स्मिता पाटील भेटले. त्यानंतर त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण राज बब्बर यांचे लग्न झाले होते. त्यामुळे राज बब्बर यांच्यासोबत स्मिता लिव्ह-इनमध्ये राहात होत्या. राज आणि स्मिताच्या नात्याला खास करून त्यांच्या आईचा विरोध होता. राज बब्बर यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुलं देखील होती. स्मितानं कुणाचं घर तोडू नये, अशी त्यांची इच्छा होती. पण स्मिता यांनी आईचं न ऐकता राज यांच्यासोबत विवाह केला.


असा झाला स्मिताचा मृत्यू

प्रतिकच्या जन्मानंतर स्मिता यांची प्रकृती चिंताजनक झाली. व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांच्या मेंदूला संसर्ग झाला होता. आजारपण वाढल्यानंतर त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा एक-एक अवयव निकामी होत गेला. प्रतिकच्या जन्मानंतर त्यांना वारंवार ताप येत होता. पण स्मिता प्रतिकला सोडून रुग्णालयात जाण्यासाठी तयार नव्हत्या. त्यांनी ताप अंगावरच काढला. त्यामुळे अखेर १३ डिसेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली.



स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा

स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा होती की, त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर एखाद्या नवरीप्रमाणं सजवलं जावं. मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली होती.



स्मिता यांना रेखा यांच्याशी करायची होती मैत्री

स्मिता पाटील रेखा यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. रेखा यांची स्टाईल आणि राहणीमान याचे स्मितांना प्रचंड आकर्षण होते. त्यांना रेखांसोबत मैत्री करायची होती. पण त्यावेळी रेखा वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करत होत्या. शिवाय रेखा यांना भिती होती की त्या स्मितात अधिक गुंतत जातील. कारण दुसऱ्याला खेचून घेण्याची शक्ती स्मिता यांच्यात होती. त्यामुळे त्यांनी जाणूनबुजून स्मिता यांना स्वत:पासून लांब ठेवलं. पण रेखा यांच्याविषयी स्मिता यांचं प्रेम कधीच लपलं नाही. रेखा यांच्यासारखा पेहेराव म्हणजेच अगदी तशाच साड्या स्मिता नेसायच्या. त्यांची हेअरस्टाईल देखील स्मिता यांना खूप आवडायची. खास करून रेखा यांचे लांबसडक केस! लेखिका ललिता ताम्हणे यांनी स्मिता यांच्यावर लिहलेल्या 'स्मितास्मित आणि मी' पुस्तकात याविषयी उल्लेख करण्यात आला आहे. ललिता ताम्हणे या स्मिताच्या खूप जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहेत.  



'कुली'च्या दुर्घटनेआधी स्मिता यांचा अमिताभ यांना फोन

अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्मिता यांनी 'नमकहलाल' आणि 'शक्ती' हे दोन चित्रपट केले होते. त्यामुळे अमिताभ आणि स्मितामध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होेते. या संदर्भात एक किस्सा ललिता ताम्हणे यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केला आहे. कुलीच्या शुटिंगच्यावेळी अमिताभ बाहेर असताना एकदा रात्री दोन वाजता त्यांनास्मिताचा फोन आला. त्यांनी घाईघाईत विचारलं, 'आपकी तबीयत कैसी है, मुझे अभी एक सपना आया था, आपके पेटसे खून निकल रहा है और आप हेल्प हेल्प चिल्ला रहे हो. आप अपना खयाल रखना,' असं त्यांनी अमिताभ यांना सांगितलं. कमाल म्हणजे दुसऱ्याच दिवशी शुटिंगच्यावेळी अमिताभ यांचा 'कुली'च्या सेटवर मोठा अपघात झाला. अमिताभ बच्चन यांनी देखील ही आठवण शेअर केली आहे.



हेही वाचा

हेरा फेरी दिग्दर्शक नीरज व्होरा यांचं निधन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा