Advertisement

बोनी-अनिलच्या उपस्थितीत ‘धडक’चा ट्रेलर लाँच


बोनी-अनिलच्या उपस्थितीत ‘धडक’चा ट्रेलर लाँच
SHARES

व्यावसायिकदृष्ट्या मराठीतील आजवरचा सर्वात यशस्वी सिनेमा ठरलेला ‘सैराट’ या सिनेमाचा हिंदी रिमेक ‘धडक’चा ट्रेलर लाँच बोनी कपूर, अनिल कपूर आणि करण जोहर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.


सैराटचा हिंदी रिमेक

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीचा पहिला सिनेमा असलेल्या बहुचर्चित ‘धडक’चा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. या सिनेमात जान्हवीच्या जोडीला शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर मुख्य भूमिकेत आहे. राजस्थानी पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं आहे.


झिंगाटचं हिंदी व्हर्जन

तीन मिनिटांचा ट्रेलर पाहताना जान्हवी आणि इशानच्या प्रेमाचा प्रवास, तसंच त्यांच्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचा अंदाज येतो. यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या सिनेमातील टायटल साँगसोबत ‘झिंगाट’च्या हिंदी व्हर्जनचाही समावेश आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे जान्हवी आणि इशान सर्वांसाठीच खास असल्याची भावना निर्माता करण जोहरने व्यक्त केली. करणने ट्रेलरसह ‘झिंगाट’च्या हिंदी व्हर्जनचंही अनावरण केलं.


रिमेक बनवताना नर्व्हस

‘सैराट’च्या रिमेकबाबत दिग्दर्शक शशांक खेतान म्हणाले की, ‘सैराट’साख्या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक बनवताना खरं तर थोडा नर्व्हस होतो. या सिनेमाची कथा प्रत्येकाला आपली वाटावी अशी असल्याने मला ती सर्वांना सांगायची आहे. मी तो आहे ज्याने ‘धडक’ बनवला आहे, असं सांगताना जान्हवी आणि इशानसोबत काम केल्याचाही अभिमान वाटतो.


२० जुलैला प्रदर्शित

नर्व्हस आहेच, पण त्यासोबतच उत्साहितही असल्याची भावना जान्हवीने व्यक्त केली. तर जेव्हा ‘सैराट’ पाहिला तेव्हा स्वत:ला हरवून बसल्याचं इशान म्हणाला. जान्हवी आणि इशानला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कुटुंबियही या सोहळ्याला हजर होते. याशिवाय गीतकार अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार अजय-अतुल, हर्षवर्धन कपूर, खुशी कपूर आणि निलीमा आझीम याही उपस्थित होत्या. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा सिनेमा २० जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

Exclusive: अशा राजकारण्यांना धरून बडवायला हवं- शरद पोंक्षे

‘फुलराणी’ बनली ‘फुलपाखरू’!
संबंधित विषय
Advertisement