Advertisement

घर गहाण टाकून 'त्याने' बनवला सिनेमा!


घर गहाण टाकून 'त्याने' बनवला सिनेमा!
SHARES

अापलं पॅशन जपण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय व राज्य पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या ‘ख्वाडा’ सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सिनेमासाठी जमीन विकली होती, आता तर संचित यादव या नवोदित दिग्दर्शकानं आपलं घर गहाण टाकलं आहे.

काहीही झालं तरी ‘शो मस्ट गो आॅन’ असं म्हणत सिनेसृष्टी आपली वाटचाल सुरूच ठेवत असते. याच परंपरेचे पाईक असलेले काहीजण आपलं पॅशन पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक अवलिया दिग्दर्शक आहे संचित यादव. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या संचितच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘बे एके बे’ हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी आपण घर गहाण टाकल्याचं संचितनं ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझिव्ह बातचित करताना सांगितलं.



१५ वर्षांपासून अभिनय

मागील १५ वर्षांपासून संचित अभिनय करत आहे. यापूर्वी ‘एक कुतूब तीन मिनार’, ‘स्वप्न तुझे नी माझे’, ‘माझी शाळा’ यांसारख्या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या संचितनं ‘कर्तव्य’ या सिनेमात खलनायकही साकारला आहे. अभिनयासोबतच नाट्य दिग्दर्शनातही संचितचा हातखंडा आहे. आजवर संचितनं साडेतीन हजारांहून अधिक पथनाट्यांमध्ये कामही केलं आहे.



अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे

सिनेमाच्या दिग्दर्शनाकडे वळण्याबाबत संचित म्हणाला की, खरं तर ‘बे एके बे’ या सिनेमात मीच मुख्य भूमिका साकारणार होतो. काही दिग्दर्शकांना या सिनेमाची कथा ऐकवली, पण ते या सिनेमाच्या विषयाला उचित न्याय देऊ शकतील असं वाटलं नाही. त्यामुळे संजय खापरेंना मुख्य भूमिकेसाठी निवडलं आणि मी दिग्दर्शकाची जबाबदारी स्वीकारली.



१८ ड्राफ्ट आणि १०० निर्माते

या सिनेमाची कथा मनात आली तेव्हा मी बरेच बदल करत १८ ड्राफ्ट्स तयार केले. त्यानंतर अभिजीत कुलकर्णी यांना कथा लिहायला सांगितली. या सिनेमासाठी जवळपास १०० निर्मात्यांना भेटलो, पण कोणालाही वास्तववादी सिनेमात रुची नव्हती. त्यांना मसालेदार सिनेमा बनवायचा होता, आयटम साँग हवं होतं. त्यामुळे मग विषयला न्याय मिळावा आणि दिग्दर्शनाचं स्वातंत्र्य मिळावं, यासाठी स्वत: अर्थातच पत्नी पूर्णिमाच्या माध्यमातून निर्माताही बनलो.



शेवटी घर गहाण

निर्माता बनण्याची माझी कहाणी कुणालाही सांगून खरी वाटणारी नाही. ‘बे एके बे’ची निर्मिती करायची ठरवली, पण हातात पैसे नव्हते. मग अंधेरीतील हिरानंदानीतील म्हाडा कॅालनीमध्ये असलेला ६५० स्क्वेअर फीटचा २ बीएचके फ्लॅट गहाण ठेवला. दीड कोटी किंमत असलेल्या या फ्लॅटवर मिळालेल्या कर्जातून सिनेमा बनवला. हेमा फाऊंडेशनचा मदतीचा हात लाभल्याने सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग सोपा झाला आहे.



नमस्ते फाऊंडेशन कारणीभूत

या सिनेमात भूमिका साकारणारे प्रथम सितारे आणि साहिल सितारे या आई-वडिलांविना वाढणाऱ्या दोन मुलांचं पालनपोषण संचितच करत आहे. इतकंच नव्हे तर नमस्ते फाऊंडेशनच्या माध्यमातून जवळपास १६० मुलं संचितनं दत्तक घेतली आहेत. शेतकरी, कातकरी, आदिवासी अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च नमस्ते फाऊंडेशनच्या माध्यमातून केला जातो. 



बिनभिंतींची शाळा

‘बे एके बे’बाबत संचित म्हणाला की, हा सिनेमा शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. मुलांना मुलांच्या पद्धतीत कसं शिक्षण द्यायचं, ते यात दाखवण्यात आलं आहे. थोडक्यात काय तर बिन भिंतींची शाळा... महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ असलेल्या चारोटी येथील ऐने गावात राममंगल सेवा संस्थेच्या वतीनं अशा प्रकारची शाळा भरवली जाते. याशिवाय ‘एकल गाव’ म्हणजेच ‘एक गाव एक शिक्षक’ ही संकल्पनाही राबवली जाते.



संजय बनला शिक्षक

या सिनेमात संजयने गावात जाऊन शिकवणाऱ्या माधव गुरुजींची भूमिका साकारली आहे. याशिवाय जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे, अरुण नलावडे, साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हाळ आदींच्याही भूमिका आहेत. विकास भगेरिया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती केली आहे. हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी प्रस्तुतकर्ते असून, प्रवीण गरजे आणि चिंतामणी पंडित सहनिर्माते आहेत.


हेही वाचा -

मेघा धाडे बनली ‘बिग बॅास’ची ‘सुपरस्टार’

आपला ‘सैराट’च 'झिंगाट'!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा