Advertisement

राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात


राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात
SHARES

ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचं नाव विख्यात आहे. ‘झाशी ची राणी’ अशी ओळख असणाऱ्या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर ‘स्वाॅर्डस अँड सेपटर्स’ नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.


लक्ष्मीबाईंची गाथा जागतिक पातळीवर

भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांत कोरल्या गेलेल्या या ज्वलंत घटनेची दखल या सिनेमाद्वारे जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्रोफेसर आणि भरतनाट्यम विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेनं यात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली असून, या आंतरराष्ट्रीय चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या मराठी चेहऱ्यांचाही समावेश आहे.


स्वाॅर्डस अँड सेपटर्स

राणी लक्ष्मीबाईची यशोगाथा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या या सिनेमाचा नुकताच पोस्टर लाँच सोहळा पार पडला. 'स्वोर्डस अँड सेपटर्स' हा हॉलीवूड सिनेमा जरी असला, तरी या सिनेमाचा विषय भारतातल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय संस्कृतीचा मुलामा चढलेला आपल्याला दिसून येतो. १८५७ च्या उठावाची क्रांतीज्योत पेटवणाऱ्या राणी लक्ष्मीबाईचं तेजस्वी रूप यात दिसतं.


मराठी-हिंदी भाषेचा वापर

हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी, यात थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील वापर करण्यात आला आहे. या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शिका स्वाती भिसे म्हणाल्या की, राणी लक्ष्मीबाईचं जीवनचरित्र स्फुरण देणारं आहे. आजच्या स्त्रियांना त्यांची शौर्यगाथा आणि त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी ठरणारा आहे. कोणत्याही पुरुष पाठबळाशिवाय मुठभर सैनिकांना घेऊन बलाढ्य इंग्रजी सैन्यावर चालून गेलेली ही महिला, जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा माझा मानस होता. त्यासाठी सर्वप्रथम तिची शौर्यगाथा नाट्यसंगीतातून मांडण्याच्या मी विचारात होते, पण या ज्वलंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची गाथा जगातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांपर्यत पोहोचवण्यासाठी चित्रपटाचा मोठा पडदा महत्वाची भूमिका बजावेल, याची जाणीव झाली आणि हा सिनेमा बनवण्याचा मी विचार केला.


स्वाती भिसेचं लेखन

हॉलीवूडच्या धर्तीवर साकार झालेल्या ‘स्वोर्डस अँड सेपटर्स’ची निर्मिती स्वाती भिसे यांनीच केली असून, चार्ल्स सेलमोन हे सहनिर्माते आहेत. स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटीश सत्ताधीशांना धाडसानं सामोऱ्या जाणाऱ्या या रणरागिणीचा ‘स्वोर्डस अँड सेपटर्स’ हा ब्रिटीश सिनेमा भारताबरोबरच जगभरात लवकरच प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा -

प्रियंकाने निक जोनसशी केला साखरपुडा

आॅरगॅनिक गार्डनच्या प्रेमात यामी गौतम



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा