Advertisement

थरारक पद्धतीने गुंफलेला 'मांजा'!


थरारक पद्धतीने गुंफलेला 'मांजा'!
SHARES

'मांजा' सिनेमाच्या ट्रेलरपासूनच हा सिनेमा काहीतरी वेगळं घेऊन येणार, याची खात्री होती. हा सिनेमा तुमची ती खात्री १००% खरी करणार यात शंका नाही. आई, तिचा मुलगा आणि मुलाचा मित्र या तिघांभोवती फिरणारी ही कथा. समिधा तिच्या नवऱ्याशी नातं संपवून गोव्यावरून मुलाला म्हणजेच जयदीपला घेऊन लोणावळ्यात येते. तिथल्याच एका कॉलेजमध्ये त्याची ११वीत अॅडमिशन होते आणि त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विकीशी त्याची ओळख होते. काही दिवसांतच विकी आणि जयदीपची चांगलीच घट्ट मैत्री होते. हे ऐकायला सोपं साधं वाटतं असलं, तरी त्यापुढे घडत जाणाऱ्या घटना मात्र सरळ साध्या नाहीत. विकी हुशार स्मार्ट मुलगा आणि जयदीप लाजरा आणि अबोल. पण तरीही त्या दोघांचं एकमेकांशी चांगलं जमू लागतं. जसजशी ही मैत्री वाढत जाते, तसतसा जयदीपला विकीच्या वागण्यात - बोलण्यात काही विचित्र गोष्टी जाणवू लागतात.


विकी जयदीपला त्याला आवडणाऱ्या मुलीबद्दल अर्थात 'माया'बद्दल सांगतो आणि त्या मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा त्याचा प्लॅन आहे, असंही सांगतो. सुरवातीला जयदीपला ही सगळी मस्करी वाटते. पण नंतर विकीच्या बोलण्या-वागण्यातले बदल जयदीपला समजू लागतात आणि मग सुरु होते 'मांजा'ची खरी कथा. 

सिनेमात सुरुवातीपासूनच पुढे काय होणार, याची उत्सुकता वाढत जाते. गोष्ट जसजशी पुढं सरकते, तसतशी ती आणखीनच रंजक होऊ लागते. सिनेमाचा विषय जसा खूप वेगळा आहे, तशी सिनेमाची मांडणीही खूप विचारपूर्वक आणि वेगळ्या पद्धतीने केली गेली आहे. 'सायकोथ्रिलर' हा विषय खूप वेगळ्या पद्धतीने या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण त्याचबरोबर आई आणि मुलाचं नातं यावरही हा सिनेमा भाष्य करतो. सिनेमाच्या मध्यांतरानंतर सिनेमा खूप वेगळ्या आणि रंजक वळणावर येऊ पोहचतो आणि सर्वात महत्त्वाचा असलेला क्लायमॅक्स प्रेक्षकांना अवाक् करण्यात यशस्वी ठरतो.  

फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या 'ध्यानीमनी' चित्रपटानंतर अश्विनी भावेला मांजाच्या निमित्ताने करियरच्या या वळणावर  आणखी एक आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे. तिच्याबरोबर दिसणारी सर्व स्टारकास्ट खूप नवीन आणि फ्रेश वाटते. अश्विनी भावे यांनी सतत मुलाच्या बाजूने उभी राहणारी समजूतदार आई खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. पण त्याचबरोबर रोहित फाळकेने साकारलेला जयदीप आणि सुमेध मुग्दलकर साकारलेला विकी या दोघांनी त्यांच्या भूमिकेला अगदी पुरेपूर न्याय दिलेला आहे. खास करून सुमेध मुग्दलकरने साकारलेला 'विकी' सिनेमा संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या डोक्यात राहतो, हे त्या भूमिकेचं खरं यश म्हणायला हरकत नाही. वेगळा विषय, वेगळी मांडणी, फ्रेश कलाकार आणि अनपेक्षित शेवट या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी जतीन वागळे दिग्दर्शित 'मांजा' सिनेमा बघायला हरकत नाही.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा