हा अनसुटेबल नव्हे तर गुड बॉय !

 Pali Hill
हा अनसुटेबल नव्हे तर गुड बॉय !

मुंबई - करण, तुझे आयुष्य खरोखरीच खूप सुंदर आहे. तुझे फक्त सामान्यज्ञान चांगले नसून तू लोकांनाही खूप चांगल्या पद्धतीने ओळखतोस. आजूबाजूच्या परिस्थितीची तुला योग्य जाणीव असते. म्हणूनच तुझ्या आत्मचरित्राचे शीर्षक `अ गुड बॉय` असे हवे होते, असे मत प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानने व्यक्त केले.

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या 'अॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्राचे प्रकाशन सोमवारी रात्री एका विशेष समारंभात झाले. पेंग्विन प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यावेळी शाहरूख बोलत होता. करणवर कौतुकाचा वर्षाव करताना शाहरुखने त्याचा सेन्सिटिव्ह बॉय, इंटेलिजंट बॉय असा उल्लेख केला. अशी खूप कमी मुले आहेत की जी पहाटे 3 वाजता आपल्या आईबरोबर बसून टेलिशॉपिंगबद्दल गप्पा मारतात. करण हा त्यापैकीच एक आहे, असेही शाहरूखने यावेळी सांगितले.

प्रसिद्ध सूत्रसंचालक शोभा डे यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात करणची छोटेखानी मुलाखत घेतली. यावेळी त्याने आपल्या आयुष्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचे आभार मानले. शाहरूख खानसोबतच्या आपल्या भेटीचा किस्साही त्याने सांगितला. अभिनेत्री काजोलबद्दल बिनसलेल्या नात्याबद्दल करणने या पुस्तकात बरेच काही लिहिले आहे. याबद्दल विचारले असता करणने सुरुवातीलाच आपणास आता आणखी काही बोलायचे नसल्याचे सांगितले. कधी कधी पुस्तकाचे एक प्रकरण संपते नि पुस्तक तसेच त्यासोबतची काही नातीही संपुष्टात येतात, या एका वाक्यात त्याने काजोलबरोबरचे आपले सध्याचे नाते स्पष्ट केले.

 

Loading Comments