Advertisement

...म्हणून ते किशोर कुमार होते!

किशोर कुमार हे त्यांचा अभिनय, आवाज, विशिष्ट शैलीमुळे ओळखले जायचेच. पण त्याहून अधिक ते ओळखले जायचे ते त्यांच्या अतरंगी आणि मजेशीर स्वभावामुळे! किशोर कुमार यांचे असे अनेक किस्से आहेत...

...म्हणून ते किशोर कुमार होते!
SHARES

किशोर कुमार हे त्यांचा अभिनय, आवाज, विशिष्ट शैलीमुळे ओळखले जायचेच. पण त्याहून अधिक ते ओळखले जायचे ते त्यांच्या अतरंगी आणि मजेशीर स्वभावामुळे! किशोर कुमार यांचे असे अनेक किस्से आहेत जे ऐकून तुम्ही चकित व्हाल.


१) अर्धे पैसे, अर्ध काम!

किशोर कुमार हे प्रचंड व्यावहारिक होते. एकदा ते एका सिनेमाचं शूटिंग करत होते. या सिनेमासाठी निर्मात्यानं अर्धेच पैसे दिले. त्यामुळे किशोर कुमार हे सेटवर अर्धवट मेकअप करूनच आले. दिग्दर्शकांनी त्यांना मेकअप करण्यासाठी सांगितले, तेव्हा किशोर कुमार म्हणाले, 'आधा पैसा, आधा काम, पूरा पैसा पूरा काम'!


२) अर्धी मिशी आणि कापलेले केस!

किशोर दा आधी पैसे घ्यायचे आणि मगच चित्रपटाच्या शूटिंगसाठी हजर राहायचे. एका चित्रपटासाठी त्यांना अर्धेच पैसे मिळाले होते. त्यामुळे त्यांनी अर्धीच शूटिंग करून नंतर येणंच बंद केलं. यावरून चित्रपट निर्मात्यांनी किशोक कुमार यांच्यावर केस दाखल केली. कोर्टाचा निकाल हा चित्रपट निर्मात्यांच्या बाजूनं लागला आणि किशोर यांना चित्रिकरणासाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले. किशोर यांनी ते आदेश मान्य केले. दुसऱ्या दिवशी ते सेटवर आले. पण त्यांना पाहून सर्वच अवाक झाले आणि निर्माते प्रचंड संतापले. कारण त्यांनी अर्धी मिशी ठेवली होती आणि केस तर त्यांनी विचित्रच कापले होते!


३) पैशासाठी घरासमोर ठिय्या

पैशाच्या बाबतीत किशोर दांचा आणखी एक मजेशीर किस्सा. चित्रपट निर्माते आर. सी. तलवार यांच्याबरोबर काम करत होते. मात्र, या सिनेमासाठी सुद्धा आर. सी. तलवार यांनी अर्धे पैसे दिले. त्यामुळे किशोर कुमार रोज सकाळी त्यांच्या घरासमोर जाऊन बसायचे आणि ओरडून म्हणायचे, 'पैसे दो पैसे दो, तलवार मेरे आठ हजार दो'!


४) अरे बजाव रे बजाव, इमानदारीसे बजाव

सत्तरच्या दशकातील एका लोकप्रिय गाण्याचा किस्सा... जे. ओमप्रकाश दिग्दर्शित 'आप की कसम' या चित्रपटातील 'जय जय शिव शंकर काँटा लागे ना कंकर', 'करवटें बदलते रहे सारी रात हम', 'जिंदगी के सफर में गुजर जाते है ये मुकाम' ही गाणी सर्वांनाच लक्षात असतील. पण या सर्व गाण्यांचं बजेट दीड लाखांपर्यंत गेलं होतं. 'जय जय शिव शंकर' या गाण्यासाठी मोठा वादकांचा ताफा होता. या गाण्याचं रेकॉर्डिंग बघण्यासाठी खुद्द जे. ओमप्रकाश आले होते. पण ओमप्रकाश यांना गाणं ऐकून मजा येत नव्हती. 

जे. ओमप्रकाश पंचमदांना बोलले, 'मजा नही आ रहा, बहुत पैसे लगेंगे, गाने पे और पचास हजार खर्च करना पडेगा'. हे ऐकून पंचमदा नाराज झाले. त्यांनी ही गोष्ट किशोरजींना सांगितली. किशोरजींनी त्यांची समस्या एका झटक्यात सोडवली. रेकॉर्डिंगच्या वेळी किशोर कुमार यांनी गाण्यात दोन ओळी टाकल्या. जय जय शिव शंकर हे गाणं ऐकताना शेवटी शेवटी ही दोन कडवी ऐकू येतात. 'अरे बजाव रे बजाव इमानदारीसे बजाव, पचास हजार खर्च किये है,’ ही कडवी म्हणजे ओमप्रकाश यांना चिमटा होता!


५) झाडांसोबत मारायचे गप्पा

किशोर कुमार यांना झाडांसोबत गप्पा मारायला आवडायचे. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, 'त्यांचा कुणी मित्र नाही. मित्र बनवण्याऐवजी झाडांसोबत गप्पा मारणं मला आवडतं'.


६) कोबीचे होते शौकिन

किशोर दा कोबीचे मोठे शौकिन होते. ते त्यांच्या कुटुंबियांना म्हणायचे की, 'मला पूर्णपणे कोबीनं झाकून द्या. मी आतल्या आत कोबी खात राहीन. तरी देखील मी संतुष्ट होणार नाही!'


७) चित्रीकरणादरम्यान पोहोचले पनवेलला!

एका चित्रपटात कार चालवायचा सीन होता. दिग्दर्शकानं सांगितलं की, 'कट बोललो की थांबायचं'. किशोर यांनी गाडी सुरू केली. पण ती थांबवलीच नाही. हिरो कुठे गेला हे युनिटला कळलेच नाही. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. अचानक पनवेलहून फोन आला. किशोरकुमार बोलले, 'कट म्हणताय की कार पुढे नेऊ?'



हेही वाचा

किशोर कुमार...एक अजब रसायन!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा