Advertisement

‘लव्ह सोनिया’ने सजग नागरिक बनवलं : सई ताम्हणकर


‘लव्ह सोनिया’ने सजग नागरिक बनवलं : सई ताम्हणकर
SHARES

तबरेज नुरानी दिग्दर्शित ‘लव्ह सोनिया’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने वजन वाढवलं ही बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. या सिनेमामध्ये सईने वेश्या व्यवसायातील अंजली नावाची व्यक्तिरेखा साकारली असून, या सिनेमाने आपल्याला सजग नागरिक बनवल्याचं ती म्हणते.


'तो' अनुभव मनाला चटका लावणारा

या सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी सईला चित्रीकरणापूर्वी देहविक्रयाच्या व्यवसायाविषयी अभ्यास करावा लागला. ‘लव्ह सोनिया’ करताना केलेल्या निरीक्षणाविषयी सई म्हणाली, समजायला लागलेल्या वयापासून आपण या व्यवसायाविषयी कितीही ऐकलं असलं तरी, माझ्यासारखी मध्यमवर्गीय सुखवस्तू घरात लहानाची मोठी झालेली व्यक्ती जेव्हा वेश्यावस्तीत पहिल्यांदा पाऊल ठेवते, तेव्हा तो अनुभव मनाला चटका लावणारा आहे. तो शब्दात न सांगण्याजोगा ठरतो. दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत पाच-पाच माणसं कशी राहतात, कशा अवस्थेत आणि वातावरणात देहाचा व्यापार होतो, हे जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यातली दु:खच तुम्ही विसरून जाता.


'इथलं वास्तव अमानवी'

या दुनियेतील वास्तवातील भयानक सत्य सांगताना सई म्हणते, इथलं वास्तव अमानवी आहे. चोरलेल्या मुलांना इथं एका छोट्या पिंजऱ्यात ठेवलं जातं. त्यांच्याकडून मजुरी करवून घेतली जाते. भीक मागून घेतली जाते, जबरदस्तीने त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकललं जातं. अशावेळी त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतात, त्याची कल्पनाही सामान्यांना नसते.


'धक्कादायक अनुभव आले'

‘लव्ह सोनिया’ या सिनेमाने आपल्याला बरेच धक्कादायक अनुभव देत सजग नागरिक बनवल्याचं सई मानते. थक्क करणाऱ्या अनुभवांबाबत सई म्हणते, या सिनेमाच्या निमित्ताने मला बरेच धक्कादायक अनुभव आले आणि त्यामुळे आता माझी गाडी कोणत्याही सिग्नलला थांबली की, समोरून भीक मागायला आलेल्या किंवा काही वस्तू विकायला आलेल्या मुलांची मी पहिल्यांदा चौकशी करते. त्यांनी दिवसभरात काही खाल्लं आहे का? ते शाळेत जातात का? याविषयी कुतूहलानं विचारते. मला अधिक सजग बनवण्याचं काम ‘लव्ह सोनिया’ सिनेमानं केल्याचं मी अभिमानाने म्हणते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा