Advertisement

अनिकेतने 'अशी' दिली 'अशोक मामांना' गुरूवंदना

अनिकेतने आपल्या लाडक्या अशोक मामांविषयीच्या भावना एका पत्राव्दारे व्यक्त केल्या. हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करताना तो म्हणाला, “सिनेमा पाहू लागलो, तेव्हापासून त्यांचा चाहता झालो. अभिनय करायला लागलो आणि त्यांना गुरू मानलं. गेल्या १२ वर्षांच्या सहवासात त्यांना कधी सांगितलं नाही, आज पहिल्यांदा माझ्या गुरूला लिहीलेलं हे मनोगत.” असं म्हणत त्याने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.

अनिकेतने 'अशी' दिली 'अशोक मामांना' गुरूवंदना
SHARES

गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकजण कळत न कळतपणे आपल्याला घडवणाऱ्या गुरूला वंदन करतो. त्यानुसार अभिनेता अनिकेत विश्वासरावनेही आपल्या गुरूला वंदन केलं. अनिकेतचे गुरू नेमके कोण? याचाही या निमित्ताने उलगडा झाला. अनिकेतच्या गुरूवर्यांचं नाव आहे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ.

होय, अनिकेतने आपल्या लाडक्या अशोक मामांविषयीच्या भावना एका पत्राव्दारे व्यक्त केल्या. हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करताना तो म्हणाला, “सिनेमा पाहू लागलो, तेव्हापासून त्यांचा चाहता झालो. अभिनय करायला लागलो आणि त्यांना गुरू मानलं. गेल्या १२ वर्षांच्या सहवासात त्यांना कधी सांगितलं नाही, आज पहिल्यांदा माझ्या गुरूला लिहीलेलं हे मनोगत.” असं म्हणत त्याने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.


काय आहे पत्रात?

प्रिय अशोकमामा,
आज गुरूपौर्णिमेचा दिवस. या सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याअगोदरपासूनच तुम्हाला गुरूस्थानी मानणाऱ्या माझ्यासाठी आजचा दिवस महत्वाचा. अभिनय असो किंवा विनोदाची अचूक वेळ साधणं असो तुम्ही दोन्हीमध्ये ‘बाप’ आहात. हे तुम्ही वेळोवेळी सर्वांना दाखवून दिलंय. नाटक, टीव्ही आणि सिनेविश्वामध्ये तुम्ही आपल्या दर्जेदार कलाकृतीने ठसा उमटविला आहे.

हे माझं भाग्य आहे की, माझा पहिला सिनेमा ‘लपून छपून’मध्ये मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. विनोदासाठी भाषेवर प्रभूत्त्व असणं किती गरजेचं आहे, हे तुम्ही शिकवलंत. विनोदाची अचूक वेळ साधणं, यासाठी गरजेची असलेली वैचारिकता खरंच आमच्या पिढीने तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे.

अनेक सिनेमांमधल्या तुमच्या भूमिकांना विनोदाची झालर असायची. पण प्रत्येक भूमिकेची लकब, संवादफेक आणि हावभाव यातल्या वैविध्यांवर तुम्ही डोळसपणे काम केल्याने तुमच्या विनोदात एकसूरीपणा कधीच जाणवला नाही, हे आमच्यासारख्या आजच्या अभिनेत्यांना शिकण्यासारखं आहे.



तुमच्यावर नेहमीच रसिकांनी विनोदी अभिनेत्याचे शिक्कामोर्तब केले. पण ‘बहुरूपी’, ‘भुजंग’, ‘कळत-नकळत’,’ अरे संसार संसार’, ‘भस्म’ यांसारख्या सिनेमांमधून तुमच्या अभिनयाची एक वेगळी छटा पाहायला मिळाली.

मी तुम्हाला अभिनयातले आणि विनोदातले बादशाह मानतो. तुमची सर दुसऱ्या कोणत्याच अभिनेत्याला येणे शक्य नाही. तुमच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याने आपण एकत्र केलेल्या ‘आंधळी कोशींबीर’या दुसऱ्या सिनेमानंतर ‘तुझ्या विनोदाची वेळ चांगली आहे’, ही मला दिलेली दाद कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मला जास्त आनंद देणारी होती.

गेली ५० वर्ष तुम्ही सातत्याने काम करत आहात, जेव्हा कधी मला काम करताना थकायला होतं. तेव्हा मी स्वत: ला प्रोत्साहन देताना तुम्हांला आठवतो. तुमची काम करण्याची उर्जा आणि सातत्य हे माझ्यासाठी नेहमीच आदर्श आहे.

तस्मै श्री गुरवे नमः।



हेही वाचा-

महारविवारमध्ये ‘राधा प्रेम रंगी रंगली’,‘तू माझा सांगाती’चे विशेष भाग

सिंध नरेशच्या लुकमध्ये मोहित अबरोल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा