'मंगलगाणी दंगलगाणी'- एक धुमशान

Mumbai
'मंगलगाणी दंगलगाणी'- एक धुमशान
'मंगलगाणी दंगलगाणी'- एक धुमशान
See all
मुंबई  -  

घनःश्याम सुंदरा...

गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी...

आदी सुमधुर आणि अर्थपूर्ण गीतं, भूपाळी, पोवाडा संगीतरसिकांनी अनेक वाद्यवृंदांमध्ये असंख्य वेळा ऐकली असतील. अनेक रंगकर्मींनी आपल्या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या मातीतलं लोकसंगीत सर्वदूर पसरवण्याची जबाबदारी पार पाडली आहे. या मंगलमय गीतांबरोबरच 

हल्लीच्या या पोरी, हल्लीची ही पोरं घोटाळे घोटाळे घोटाळे करती...  

सायन आया, सायन आया, दादर, माटुंगा, सायन आया...

माझ्या घोवाचो कागद इलो, गे आये धाड मुंबईक माका...

सारखी उडत्या चालीची दंगलगीतं एकत्र ऐकायला मिळाली तर? गेली सुमारे तीस वर्ष हा अफलातून सांगितिक नजराणा महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील किंबहुना जगभरातील मराठी संगीतरसिकांवर अशोक हांडे हा हरहुन्नरी कलावंत उधळत आला आहे. कार्यक्रमाचं शीर्षक एकूण बाजाला साजेसं- 'मंगलगाणी, दंगलगाणी'.  वाद्यवृंदाच्या इतिहासात एक वेगळा प्रयोग म्हणून रसिकमान्यता मिळवणाऱ्या  ‘मंगलगाणी दंगलगाणी’या कार्यक्रमाने आता 2000 प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. या कार्यक्रमाचा दोन हजारावा प्रयोग ८ ऑगस्टला विलेपार्ल्यातल्या मास्टर  दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रंगला. 


 


ऐंशीचं दशक हे वाद्यवृदांचं सुवर्णयुग होतं. झपाटा, कलाकार, झंकार सारख्या वाद्यवृंदांना रसिकप्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. याच काळात, 1987 साली 'मंगलगाणी दंगलगाणी' हा अभिनव प्रयोग सुरू झाला. कार्यक्रमाचा पूर्वार्ध मंगलगाण्यांचा आणि उत्तरार्ध दंगलगाण्यांचा. मध्यांतराच्या आधी मंत्रमुग्ध होऊन खुर्चीला खिळलेल्या अवस्थेत भक्तिगीतं आदी ऐकणारा श्रोता मध्यांतरानंतच्या धम्मालगीतांनी त्याच खुर्चीवरून उसळतो. ही किमया 'मंगलगाणी दंगलगाणी'ची. अभंग, वामन पंडित, मोरोपंत यांचं काव्य, शाहिरी काव्य, पोवाडे, लावणी, गवळण, नाट्यसंगीत, भावसंगीत, सुगमसंगीत, चित्रपट गीतं असा महाराष्ट्राचा सांगीतिक ठेवा या कार्यक्रमातून उलगडत जातो. 

'मंगलगाणी, दंगलगाणी'ची कीर्ती पार सातासमुद्रापार पोहोचली. लंडन, शिकागो, लॉस एंजेलिसमध्ये या कार्यक्रमाचे प्रयोग तुफान गर्दीत चालले. वाद्यवृंदांचा पडता काळ सुरू झाला. कालांतराने अनेक वाद्यवृदांनी आपलं चंबु गबाळं आवरलं. मात्र 'मंगलगाणी, दंगलगाणी'ची घोडदौड संपली नाही. आतापर्यंत नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्ल चा बोर्ड लागला नाही, असा मंगलगाणी दंगलगाणीचा प्रयोग शोधण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील. लंडनमध्ये या कार्यक्रमाचा 555वा प्रयोग करण्यात आला होता आणि त्याचवेळी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर तिथे तब्बल 7 प्रयोग करण्यात आले. आज चांगली ऑफर मिळाल्यावर इकडून तिकडे उडी मारण्याच्या व्यावसायिक काळातही 'मंगलगाणी, दंगलगाणी'ची जुनी टीम सलग तीस वर्ष एकसंध आहे, हे विशेष. हा मराठी रंगभूमीवरचा आणखी एक विक्रमच म्हणायला हवा. विशेष म्हणजे गेली तीस वर्षे एकच टीम घेऊन ‘मंगलगाणी...’चा हा प्रयोग सादर करणं हाही रंगभूमीवरील एक अनोखा विक्रम ठरणार आहे.


7ऑक्टोबर 1987साली ‘मंगलगाणी दंगलगाणी’चा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे झाला होता.आणि आज त्या 1 चे 2000 होत आहेत. माझा यात खरंतर काहीच वाटा नाही. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटू लागलं, 'मंगलगाणी दंगलगाणी' कमर्शिअल पातळीवर आलं पाहिजे आणि मग पहिला प्रयोग झाला. आजही या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत ह्याचा खरंच आनंद वाटतो. मंगलगाणी दंगलगाणी मध्ये मराठी संस्कृती, ओव्यांपासून ते शिव्यांपर्यंत, शेतापासून ते अंगणापर्यंत सगळं दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. आजची पिढी ओवी, पोवाडे, अभंग  म्हणजे काय हे जेव्हा विचारते तेव्हा त्यांना 'मंगलगाणी दंगलगाणी' दाखवू शकतो.  

 अशोक हांडे

निर्माता , दिग्दर्शक , लेखक

Loading Comments
© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.