Advertisement

'रेडू'नंतर उत्सुकता सागरच्या 'रापण'ची...


'रेडू'नंतर उत्सुकता सागरच्या 'रापण'ची...
SHARES

आजच्या पिढीतील बरेच तरुण दिग्दर्शक अनोख्या शीर्षकांतर्गत वैविध्यपूर्ण विषय हाताळत आहेत. अशा दिग्दर्शकांपैकीच एक असलेल्या सागर वंजारीने 'रेडू' नंतर पुन्हा एकदा 'रापण' असं काहीसं वेगळं शीर्षक असलेल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.


मोशन पोस्टर लाँच

सागरने 'रेडू' या पहिल्याच चित्रपटात समीक्षकांपासून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं होतं. बऱ्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही हा चित्रपट आकर्षणाचं केंद्र बनला होता. या चित्रपटानंतर सागर वंजारीनं नववर्षाच्या मुहुर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सागरच्या आगामी मराठी चित्रपटाचं शीर्षक 'रापण' असून, त्याने १ जानेवारीला सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच केलं आहे. 


जाळं असलेली होडी 

'रापण' या फेसबुक पेजवरून लाँच करण्यात आलेल्या या पोस्टरमधून समुद्राच जाळं असलेली एक होडी दिसते आणि 'रापण' हे शीर्षक येतं. अत्यंत नयनरम्य आणि विहंगम असं हे मोशन पोस्टर आहे. या मोशन पोस्टरमुळे प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं लेखन केलं असल्याचं पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.


शीर्षक लक्ष वेधणारं

'रेडू' या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये मानसन्मान प्राप्त झाले होते. इतकंच नव्हे तर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अरविंदन पुरस्काराने सागरला गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे सागरच्या नव्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांचेही लक्ष लागणं स्वाभाविक आहे. अपेक्षेप्रमाणे सागरनेही आपल्या काहीशा हटके अशा शैलीत चित्रपटाचं शीर्षक ठेवलं असून 'रेडू' प्रमाणेच हे शीर्षकही लक्ष वेधून घेणारं आहे. चित्रपटाची कथा, कलाकार तसंच तंत्रज्ञांबाबतचा तपशील योग्य वेळी जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, 'रापण'च्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय मांडला जाणार असल्याचं सागरचं म्हणणं आहे.



हेही वाचा - 

नव्या वर्षात 'बायोपिक'चं पीक जोमात!

अनिकेतच्या उपस्थितीत 'क्षितिजा परी...' लाँच




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा