Advertisement

बलमवा बंबई गईल हमार!

हिंदी सिनेमा हिंदी पट्ट्यातच निघाला पाहिजे. ते उत्तर प्रदेशाच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना फारच पटलं… परंतु तिथे अजूनही कसलाही विकास न झाल्यामुळे कोरोनाकाळातही मुंबईची वाट धरणाऱ्या गरीब भूमिपुत्रांवर काढावा लागेल.

बलमवा बंबई गईल हमार!
SHARES

उत्तर प्रदेशातून एक चांगली बातमी आली आहे…

उत्तर प्रदेशातून चांगली बातमी येणं हे कंगनाने पूर्ण शुद्धीत, सेन्सिबली लिहिलं असावं असं वाटणारं ट्वीट करण्याइतकं किंवा अर्णबने पडद्यावर न किंचाळता समोरच्याला बोलू देण्याइतकं किंवा मोदी सरकारमध्ये ज्याच्या खात्याबद्दलचा विषय आहे, त्या मंत्र्याने त्यावर खुलासा करण्याइतकं दुर्मीळ आहे… जेव्हा पाहावं तेव्हा तिकडून लहान मुलं आॅक्सिजनअभावी तडफडून मरण पावली, कुणा गुंडाने पोलिसांना मारलं, मग पोलिसांनी गुंडाला मारलं, बनावट एन्काउंटर्स, अल्पसंख्याक आणि दलितांवर अत्याचार, याच स्वरूपाच्या बातम्या येत असतात… आता काहींना तिथे एखादं मंदिर उभं राहणार हीसुद्धा चांगली बातमी वाटू शकते… तशी ती आहेही. कोरोनाच्या भीतीने इकडून तिकडे गेलेल्या तिकडच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला नाही, तर मंदिर तरी उपयोगी पडेल… बांधून झाल्यावर… समोर रांगा लावून बसण्याइतका परिसर विस्तीर्ण ठेवा म्हणजे झालं… 

पण, उत्तर प्रदेशातून आता आलेली बातमी मात्र खरोखरच फार चांगली आहे, तिचं स्वागत केलं पाहिजे. उत्तर प्रदेशात हिंदीच नव्हे, तर वैश्विक सिनेमांसाठी उपयुक्त ठरेल (म्हणजे मंगळावरच्या किंवा शुक्रावरच्या प्राणीसृष्टीलाही सिनेमा काढायचा असेल, तर आता पृथ्वीवर वैश्विक दर्जाची सोय असणार), अशी फिल्मसिटी उभारण्याचा चंग तिथल्या मुख्यमंत्र्यांनी बांधला आहे. त्यांना कुणी विन डिझेलचे सिनेमे दाखवले की काय कोण जाणे… नाहीतर सिनेमासारखा अभद्र विषय त्यांच्यासारख्या सुसंस्कारी मनुष्याच्या तोंडून बाहेर पडला नसता… हे कशामुळे झालं? 

झालं असं की मुंबईत हयात काढलेल्या आणि अजूनही इथेच असलेल्या काही उत्तर भारतीय कलावंतांना सकाळी सकाळी (हल्ली एनसीबीच्या भीतीने काही ‘जीवनावश्यक पदार्थ’ मिळत नसल्याने नीट व्यवस्थित शुद्धीत) जाग आली आणि त्यांनी साडे तीन मिनिटं सलग, सुसंबद्ध विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिंदी ही मुळात गोपट्टा (काही नतद्रष्ट लोक गोबरपट्टाही म्हणतात हल्ली) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात बोलली जाणारी भाषा आहे आणि त्या भाषेतले सिनेमे आपण इथे या मराठी माणसांच्या भूमीत बनवतो आहोत, इथेच हिंदी गाणी गातो आहोत, हे काही बरोबर नाही. यापेक्षा आपल्या राज्यात ‘अकलवा भैंस चरल गईल हमार’ असा जागतिक दर्जाचा सुसंस्कारी सिनेमा बनवता आला असता किंवा म्हशीच्या पाठीवर उलटं बसून ऊसाची कांडं तोडत मोकळ्या आवाजात गाणी गाता आली असती. हे आता चाललंय ते अजिबात बरोबर नाहीये.

त्यांनी सांगितलं की हिंदी सिनेमा हिंदी पट्ट्यातच निघाला पाहिजे. ते उत्तर प्रदेशाच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना फारच पटलं… एकंदरच उत्तर भारतीय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं हे एक खास वैशिष्ट्य आहे… त्यांच्याकडून पोटामागे मुंबईत आलेले भूमिपुत्र जेव्हा कोरोनाच्या भयाने इथून चालत घराकडे निघतात, तेव्हा त्यांच्यासाठी काही सोय करण्याची संवेदनशीलता त्यांच्यात नसते. उलट त्यांना राज्याच्या सीमेवर अडवून आपापल्या घरी जाण्यापासूनही अडवलं जातं. असे किती मजूर निघाले, किती वाटेत मेले, जे घरी पोहोचले त्यांचं काय झालं, त्यांना कामधंदा देता येईल का, याची यांना चिंता नसते… मुंबईत राहून, इथे काम करून गब्बर झालेल्यांना अचानकपणे मुंबई असुरक्षित, कुसंस्कारी वगैरे असल्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्यांची संवेदनशीलता जागी होते आणि ते लगेच वैश्विक दर्जाची फिल्मसिटी बांधून द्यायला तयार होतात… या मंडळींना सिनेमासृष्टीतल्या सुकांत चंद्राननांचा एकंदर लळाच फार हे महाराष्ट्रातही राजभवनावरच्या भेटीगाठींमधून कळतंच म्हणा… त्यांच्यासाठीही तिकडे फिल्मसिटीशेजारीच वृद्धाश्रम बांधण्याची काही व्यवस्था करता आली तर बेस्ट होईल…

हेही वाचा- 'के' फाॅर काही का असेना, लक्षात ठेवा फक्त 'सी' फाॅर कोरोना!

हिंदी सिनेमा मुंबईतून निघाला नसता, उत्तर भारताच्या संस्कारसंपन्न, कलासंपन्न राज्यांतूनच निघाला असता, तर तो अधिक मर्यादशील, सुसंस्कारी आणि एखाद्या भरगच्च भोजपुरी नटीप्रमाणे भारतीय शालीनतेने ठासून भरलेला झाला असता, असा इथल्या खाल्ल्या ताटातच स्वच्छ भारत अभियान करणाऱ्या कलावंतांचा दावा आहे… यांना हे सगळं करण्यापासून कोणी अडवलं होतं, हा प्रश्न सध्या सोडून देऊ. त्यासाठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात शिरावं लागेल. शिवाय हे बरोबरच आहे की बंगालमधलं न्यू थिएटर्स, एकत्रित पंजाबातल्या लाहोरमधल्या कंपन्या आणि महाराष्ट्रातल्या प्रभात पिक्चर्ससारख्या कंपन्यांनी हिंदी सिनेमाची घडण केली म्हणून तो सर्वसमावेशक बनला आणि आधुनिक बनला. उत्तर भारतातल्याच नव्हे तर (दक्षिणेच्या चार राज्यांचा अपवाद वगळता) भारतभरातल्या ज्या कलावंतांना या क्षेत्रात काही करून दाखवावंसं वाटलं, त्यांनी मुंबईची वाट धरली, सगळा भारत जिथे एकवटला आहे अशा या मुंबई शहराने त्यांच्यावर तेच सर्वसमावेशकतेचे, भारतीयत्वाचे संस्कार केले, व्यापक भान दिलं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कलेची कदर केली. इथे एकीकडे आपली माणसं आणून सरकारी नोकऱ्यांत घुसवण्याचे गैरप्रकार करणाऱ्यांना मराठी बाण्याने ठणकावलं जात होतं, पण दुसरीकडे कलेच्या प्रांतात येणाऱ्या कुणालाही या शहराने जात धर्म, जात, पंथ, भाषा वगैरेंची विचारणा केली नाही, फक्त कलागुण पाहिले आणि संधी दिली… संधीचं सोनं करायला योग्य वातावरण दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलात्मक मोकळीक दिली… 

मुंबई शहराने चित्रपटसृष्टीतल्याच नव्हे तर एकंदरित महिलांना सुरक्षितता दिली. इथे संध्याकाळी सातनंतरही महिला बाहेर फिरू शकतात, मध्यरात्री रस्त्यावरून फिरताना कुणी अपहरण करील किंवा लुटेल, अशी भीती इथे वाटत नाही. अल्पवस्त्रांकित मुलगी दिसल्यावर तिचे बुभुक्षितासारखे लचके तोडले जात नाहीत नजरेने किंवा प्रत्यक्ष, इथे कोण काय खातो आहे, हे शेजारचा डोकावून पाहायला येत नाही, इथे जातीनुसार कामांची विभागणी नाही आणि ट्रेनमध्ये शेजारी ‘अछूत’ बसला म्हणून कुणी अपवित्र होत नाही, कुणाचा (त्यावरून) जीव जात नाही… 

…हे सगळे कुसंस्कारच आहेत आजच्या काळात अनेकांसाठी. 

…अशा मंडळींना मुंबईच्या मोकळिकीची गरजच नसलेली सरकारमान्य संस्कारी चित्रपटनिर्मिती करायची असेल तर उत्तर प्रदेशातल्या वैश्विक फिल्मसिटीचा पर्याय अतिउत्तमच आहे… तिथे काही कलावंतांच्या इतर गरजाही पूर्ण होतील… रिया चक्रवर्तीकडे ‘सापडला’ तेवढा गांजा तिथे हरएक गांजेकस साधूसंन्याशाच्या झोळीत सापडतो आणि भांगेची तर सरकारमान्य दुकानंच आहेत… ही भूमी तिथे भाजपची सत्ता असल्यामुळे आपोआपच परमपवित्र असल्यामुळे एनसीबीचे छापे वगैरे पडण्याचीही भीती नाही…

…अडचण फक्त एक आहे… तिथे एकतर दादा कोंडक्यांनाही लाजवतील अशा द्वयर्थी संवादांनी, अश्लीलतासूचक हालचालींनी, आॅटोट्यून केलेल्या भसाड्या आवाजांतल्या पचपचीत गाण्यांनी भरलेले भोजपुरी सिनेमे काढावे लागतील किंवा वास्तवदर्शी सिनेमा काढायचा झाला तर तो तिथे अजूनही कसलाही विकास न झाल्यामुळे कोरोनाकाळातही मुंबईची वाट धरणाऱ्या गरीब भूमिपुत्रांवर काढावा लागेल आणि या विषयावरच्या फेसबुक पोस्टीवर एका कमेंटकर्त्याने सुचवल्याप्रमाणे त्या सिनेमाचं टायटल असेल… बलमवा बंबई गईल हमार!

हेही वाचा- ये क्या हो रिया है?

संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा