Advertisement

'नवरा असावा तर असा' चं त्रिशतक!

कलर्स मराठी वाहिनीवरील 'नवरा असावा तर असा' हा कार्यक्रम नवऱ्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचं म्हणजेच बायकोचं मन जिंकण्याची एक संधी दर आठवड्यात देतो. या कार्यक्रमाने नुकताच ३०० भागांचा पल्ला गाठला आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री हर्षदा खानविलकर करत आहे.

'नवरा असावा तर असा' चं त्रिशतक!
SHARES

नाटकांसाठी जसा ठराविक प्रयोगांचा किंवा चित्रपटांसाठी ठराविक आठवड्यांचा टप्पा गाठणं ही अभिमानास्पद बाब असते तशी छोट्या पडद्यावरील मालिका किंवा कार्यक्रमांसाठी शतकीय भागांचा टप्पा पार करणं मानाचं मानलं जातं. अशा मानाच्या कार्यक्रमांच्या यादीत आता 'नवरा असावा तर असा' चा समावेश झाला आहे. या कार्यक्रमानं नुकताच त्रिशतकीय टप्पा पार केल्याचा आनंद साजरा केला.


मन जिंकण्याची संधी

प्रत्येक स्त्रीसाठी तिचा नवरा म्हणजे तिचा अभिमान असतो. नवरा म्हणजे तिचा जोडीदार, सखा आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा संसाराचा आधारस्तंभ. कलर्स मराठी वाहिनीवरील 'नवरा असावा तर असा' हा कार्यक्रम नवऱ्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचं म्हणजेच बायकोचं मन जिंकण्याची एक संधी दर आठवड्यात देतो. टेलिव्हीजनवर आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं, पण या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेताना आपण पाहत आहोत... 


३०० भाग पूर्ण

नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाने नुकताच ३०० भागांचा पल्ला गाठला आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री हर्षदा खानविलकर करत आहे. या कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदाशी मनमोकळेपणे गप्पा मारतात, त्यांच्या आठवणी - प्रवास सांगतात. हे अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरणारे असतात. आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांना आवडत आहे. इतकंच नव्हे तर हर्षदाची वेशभूषा, तिच्या साड्या, त्यांची 'नवरा असावा तर असा' हे बोलण्याची शैलीदेखील प्रेक्षकांना भावत आहे. 


पहिल्यांदाच सूत्रसंचालन

प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रेमामुळेच 'नवरा असावा तर असा' या कार्यक्रमाने ३०० भाग पूर्ण केल्याचं सांगत हर्षदा म्हणाली की, 'नवरा असावा तर असा' हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा प्रवास कसा होईल याची जराही कल्पना नव्हती. कारण, मी पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार होते. काही अनुभव नव्हता, पण मी आव्हान स्वीकारलं. 


आयुष्याचा भाग 

आता जवळपास वर्ष झालं. खूप मज्जा येत आहे. बऱ्याच धम्माल जोडप्यांना भेटले, त्यांचे अनुभव, त्यांच्या गोष्टी ह्रदयाला भिडल्या. हा अनुभव मी शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत. कारण मी हे रोज अनुभवते आहे. ही जोडपी नव्हे, तर यांचं संपूर्ण कुटुंब माझ्या आयुष्याचा भाग होत आहे. रसिक प्रेक्षकांचं प्रेम माझ्यावर होतं, आहे आणि ते यापुढेही असंच राहील अशी अपेक्षाही हर्षदाने व्यक्त केली.हेही वाचा -

आला रे आला 'सिम्बा' आला...

केदारनाथ चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा