SHARE

युवावर्गाला मोहिनी घालणारी शब्दकळा म्हणजे आजच्या मराठी चित्रपटांचं संगीत, हे समीकरण गेल्या काही वर्षांत तयार झालं आहे. त्यात चित्रपट अवखळ तारुण्याच्या प्रेमकहाणीने नटलेला असला तर संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायकाच्या प्रतिभेलाही बहर येतो. गाणी मात्र मनापासून रचली, संगीतबद्ध केली आणि गायली गेली पाहिजेत, ही अट लागू. चित्रपटाच्या शीर्षकातूनच आपला मनसुबा स्पष्ट करण्यासाठी 'कंडिशन्स अप्लाय- अट लागू' या चित्रपटाची टीम येत्या सात जुलेैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. डॉ. संदेश म्हात्रे  यांची  निर्मिती आणि  गिरीश मोहितेंचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील. समाजात बराच चर्चिल्या गेलेल्या 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या ट्रेंडवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. 

अवखळ तारुण्याच्या भिन्न छटा प्रेक्षकांपर्यंत आणण्यासाठी चित्रपटांमधल्या गीतांचा खुबीने वापर झाला असल्याचा अविनाश-विश्वजीत या संगीत दिग्दर्शक जोडगोळीचा दावा आहे. कथानकाची गरज लक्षात घेऊन वेगळ्या जॉनरची गाणी देण्याच्या संगीत दिग्दर्शकांच्या प्रयत्नांना रोहित राऊत, फराद भिवंडीवाला, प्रियंका बर्वे, आनंदी जोशी आदी पार्श्वगायकांनी साथ दिली आहे. कथानकाच्या गरजेनुसार रोमँटिक गाण्यांचं प्रमाण जास्त असलं तरी आनंद शिंंदे आणि गंधार कदम यांनी गायलेलं 'मार फाट्यावर' हे रॅप गीत धम्माल उडवून देईल, असं भाकीत वर्तवून चित्रपटाशी  संबंधित जवळपास सर्वजण आतापासूनच मोकळे झाले आहेत. 

प्रेक्षक चांगल्या चित्रपटांचं स्वागतच करतात. आशय, विषय, गीत, संगीत आदी आघाड्यांवर दर्जेदार असेल तरच आमचा प्रतिसाद मिळेल, या सूज्ञ प्रेक्षकांच्या 'कंडिशन्स अप्लाय- अटी लागू' आहेत, हे चित्रपटाच्या टीमला वेगळं सांगायला नकोच.संबंधित विषय
ताज्या बातम्या