Advertisement

समीर आणि मीराचं होणार ब्रेकअप


समीर आणि मीराचं होणार ब्रेकअप
SHARES

असं म्हणतात की लग्न झाली की ९ दिवस नवलाईचे आणि मग नवरा-बायकोमध्ये असलेलं प्रेम हळूहळू कमी होऊ लागतं. कधीही न भांडण्याच्या आणाभाका हवेत विरुन जातात आणि कोणत्या गोष्टीवरुन भांड्याला भांडं लागतं याचा पत्ताही लागत नाही. हेच छोटे छोटे वाद नंतर मोठे होतात आणि ब्रेकअप अर्थात नवरा- बायको वेगळे होण्यास कारणीभूत ठरतात. का होतं असं, याचा उलगडा करणारी नवी मालिका 'तुझं माझं ब्रेकअप' लवकरच झी मराठीवर सुरू होत आहे.



ही कथा असणार आहे समीर आणि मीराची. एकाच महाविद्यालयात शिकणारे हे दोघे जण. वर्गातील बाकावरुन बागेतील बाकावर यांचं प्रेम कधी पोहोचलं हे त्यांनाही कळालं नाही. समीर हा धनाड्य देसाई कुटुंबाचा एकुलता एक लाडका सुपूत्र. विशेषतः आईचा लाडका. हवं ते हवं तेव्हा हातात मिळतंय. त्यामुळं कष्टाची आणि शिस्तीची त्याला कधीच सवय लागली नाही. 

तर दुसरीकडे मीरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिस्तबद्ध मुलगी. स्वतःचं काम स्वतः करणारी आणि कुणी काम करताना पसारा केला की त्याला धारेवर धरणारी. असे हे भिन्न स्वभावाचे दोन जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यात आकंठ बुडतातही. असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं यांच्या बाबतीतही होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात, पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरु होते संसाराची तारेवरची कसरत. 



लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात. लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे आता एकमेकांनाच सहन करतायत की काय, असं चित्र निर्माण होतं. आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळं होण्याचाही निर्णय घेतात. 

लग्नानंतर वर्षभरातच वेगळं झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव भासायला लागते आणि प्रेमाची जाणीवही व्हायला लागते आणि मग ते दोघे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात. पण हा निर्णय त्यांच्या घरच्यांना मान्य होईल का ? पुन्हा एकत्र येतांना आधी केलेल्या चुकांना टाळण्यासाठी दोघांना काय कसरत करावी लागेल ? आणि प्रेमाचा गोडवा हरवलेला हा संसार पुन्हा गोडी गुलाबीचा संसार बनेल का? हेच सगळं आपल्याला 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेत पाहायला मिळेल.



या मालिकेत समीरची भूमिका सायंकित कामत हा अभिनेता साकारत आहे, तर मीराच्या भूमिकेत केतकी चितळे ही अभिनेत्री आहे. याशिवाय मालिकेत रोहिणी हट्टंगडी, उदय टिकेकर, विजय निकम, राधिका हर्षे, संयोगिता भावे, रेश्मा रामचंद्र, उमेश जगताप, मधुगंधा कुलकर्णी आदी अनुभवी कलाकारांची फौजही बघायला मिळणार आहे.

येत्या १८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. ही मालिका आपल्याला झी मराठी या वाहिनीवर पाहता येईल.



हे देखील वाचा -

'सुबोध भावे' आता ढोलकी वादकाच्या भूमिकेत



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा