Advertisement

'नशीबवान' भाऊचं 'उनाड पाखरू...'

छान तयार होऊन आजूबाजूच्या लोकांना आनंदानं जोरात सांगत भाऊ आणि त्याचं कुटुंब बाहेर फिरायला जातं. मॉल फिरून झाल्यावर मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतं. या गाण्यात दिग्दर्शकाने अगदी छोट्या-छोट्या गोष्टी टिपल्या आहेत.

'नशीबवान' भाऊचं 'उनाड पाखरू...'
SHARES

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला भाऊ कदम सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये आहे. 'नशीबवान' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात भाऊची मुख्य भूमिका असून त्याचं 'उनाड पाखरू...' रसिकांच्या मनात रुंजी घालण्यासाठी सज्ज झालं आहे.


मॉल न्याहाळताना उत्सुकता 

भाऊच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटातील नवीन गाणं 'पाखरू...' रिलीज झालं आहे. एक सामान्य माणूस आपल्या बायको, मुलांना घेऊन जेव्हा प्रथमच बाहेर फिरायला निघतो, तेव्हा तो एका मॉलमध्ये जातो. आजच्या काळात महत्त्वाची ठरत असलेल्या मॉल संस्कृतीत तो जेव्हा फिरतो, तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला 'मॉलचं' खूप अप्रूप वाटतं. संपूर्ण मॉल नजरेनं न्याहाळताना त्याच्या नजरेत असलेली उत्सुकता आणि आनंद गाणं पाहताना जाणवते. 


कुटुंबाला अानंद देण्याचा प्रयत्न

सामान्य माणूस पैशाअभावी जो आनंद स्वतः घेऊ शकत नाही आणि परिवाराला देऊ शकत नाही तो आनंद  पैसे मिळाल्यावर कुटुंबाला देण्याचा प्रयत्न भाऊ या गाण्यात करताना दिसतो. छान तयार होऊन आजूबाजूच्या लोकांना आनंदानं जोरात सांगत भाऊ आणि त्याचं कुटुंब बाहेर फिरायला जातं. मॉल फिरून झाल्यावर मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतं. या गाण्यात दिग्दर्शकाने अगदी छोट्या-छोट्या गोष्टी टिपल्या आहेत. जसं मॉलमध्ये टॉयट्रेनमध्ये बसल्यावर मुलांना सांभाळून नीट बसवताना वाटणारी भीती, हॉटेलमध्ये वेटरकडून जेवण वाढून घेताना होणारी अस्वस्थता, जेवण झाल्यावर टिशु पेपरमध्ये खडीसाखर बांधून घेणं हे सर्व बघताना आपण या गाण्याला कुठेना कुठे जोडून घेतो. 


शाल्मलीचा भारदस्त आवाज

या गाण्यात भाऊसोबत मिताली जगताप-वराडकरचा अभिनय पाहायला मिळतो. शाल्मली खोलगडेचा भारदस्त आवाज, सोहम पाठकचं संगीत आणि जोडीला शिवकुमार ढाले यांचे अर्थपूर्ण शब्द या गाण्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळतात. एवढे सगळे उत्तम जुळून आल्याने एक झकास गाणं पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसेल अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अमोल गोळेने व्यक्त केली आहे.      


११ जानेवारीला प्रदर्शित

हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शासोबतच छायाचित्रणही अमोल गोळेने केलं आहे. या चित्रपटात भाऊने एका सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारली असून, त्यासाठी खूप मेहनतही घेतली आहे. यात भाऊ आणि मितालीसोबत नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे आदी कलाकारांचा अभिनय पाहायला मिळेल.


लिंक : https://www.youtube.com/watch?v=qaF7jOfBXLE&feature=youtu.be



हेही वाचा - 

'रेडू'नंतर उत्सुकता सागरच्या 'रापण'ची...

नव्या वर्षात 'बायोपिक'चं पीक जोमात!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा