Advertisement

तब्बल एकोणतीस वर्षांनंतर गुलजार यांची स्वप्नपूर्ती


तब्बल  एकोणतीस वर्षांनंतर गुलजार यांची स्वप्नपूर्ती
SHARES

पलक से पानी गिरा है, तो उसको गिरने दो
कोई पुरानी तमन्ना पिघल रही होगी


शब्दांचे खेळिया गुलजार यांच्या लेखणीतून स्त्रवलेल्या या ओळींमध्ये कधीकाळच्या, जीर्ण झालेल्या आठवणींचा उमाळा दडला आहे. जे निसटून गेलं, त्याचा शोक नको. पण निसटलेलं फुलपाखरू स्वतःच्या पंखांचे रंग बोटांवर सोडून जातं, त्याचं काय करायचं? पुसले गेले असं वाटत असताना तोच रंग पुन्हा डोळ्यासमोर येतो आणि आठव जागवतो. हाच तो 'पलक से पानी गिरने का' आणि 'पुरानी तमन्ना पिघलने का' पल... कवी, शायर, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, तत्ववेत्ता गुलजार यांच्या ह्रदयातला हळवा कोपरा म्हणजे 'लिबास'… त्यांची पूर्ण होऊनही अपूर्ण राहिलेली, रुपेरी पडदा पाहू न शकलेली कलाकृती. 'लिबास' प्रदर्शित न झाल्याची सल मनात जपणाऱ्या गुलजार यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून ‘लिबाज’ च्या प्रदर्शनाची ग्वाही मिळाली आहे. तीही तब्बल एकोणतीस वर्षांनी!


गुलजार यांच्यासाठी ‘बर्थ डे’ गिफ्ट

सीली हवा छू गई
सीला बदन छिल गया
नीली नदी के परे
गीला सा चांद खिल गया


'लिबास'मधल्या या ओळी चित्रपटरसिक आणि त्यातही गुलजारप्रेमींनी ऐकल्या नसतील, यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. खास गुलजार शैलीतल्या कथानकानं नटलेला ‘लिबाज’ 1988 मध्ये प्रदर्शित व्हायचा होता. गुलजार यांची ही अतिशय जवळची कलाकृती आहे. त्यांच्या ‘रावीपार’ या कथासंग्रहातील 'सीमा' या लघुकथेवर बेतलेल्या या चित्रपटाबद्दल आपल्या काही मुलाखतींमध्ये बोलताना हळवे झालेले गुलजार अनेकदा पहायला मिळाले आहेत. 'लिबाज' प्रदर्शित करण्याचे निर्माते विकास मोहन यांचे सर्व प्रयत्न फसल्यानंतरही हा चित्रपट गुलजार यांच्यासाठी ‘भूली दास्ताँ’ ठरू शकला नाही.

गुलजार यांचे निस्सीम चाहते आणि 'लिबास'चे निर्माते विकास मोहन यांनी गुलजार यांना त्यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त 'लिबास' भेट देण्याचं ठरवलं आहे. विकास मोहन यांचे पुत्र अमूल आणि अंशुल यांनी आपण हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याची माहिती दिली आहे. ‘झी स्टुडिओ’ या चित्रपटाचं वितरण करणार असल्याची माहिती ‘मुंबई लाइव्ह’ला मिळाली आहे.



‘लिबास’ का रखडला?

चित्रपटांची गाणी ‘दूरदर्शन’ (तेव्हा खाजगी वाहिन्यांचं प्रस्थ निर्माण झालं नव्हतं) वर सादर व्हायला सुरूवात झाली होती. साक्षात गुलजार यांचं दिग्दर्शन, आर डी बर्मनचं संगीत, लता मंगेशकर यांचं पार्श्वगायन, नसीरुद्दीन शहा, शबाना आजमी, राज बब्बर, उत्पल दत्त सारखे कसलेले कलावंत असा रुबाब असलेली ही कलाकृती चित्रपटगृहापर्यंत पोहोचू शकली नव्हती. चाकोरबाहेरची कथा आणि तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीशी तादात्म्य न पावणारा विषय हे समीकरण 'लिबास'साठी अडचणीचं ठरलं.


आता मात्र 'लिबास'च्या प्रदर्शनाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. एकोणतीस वर्षांपूर्वी ‘'लिबास'’च्या प्रदर्शनाच्या वाटेवरचे अडथळे वेगळे होते. आज विषयाच्या अनुषंगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग सुकर असला तरीही तुलनेनं जुनं तंत्रज्ञान, चर्चेत नसलेले कलाकार अशा अवस्थेतला चित्रपट पाहण्यास कुणी उत्सुक असेल का? हा प्रश्न आहेच. मात्र गुलजारप्रेमींसाठी त्यांच्या लाडक्या कलाकृतीचं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शन करून चित्रपटाविषयी चर्चा घडवून आणली जाऊ शकते. बाकी काही असो, कल्ट चित्रपट आणि गुलजार यांना मिळालेली बर्थ डे गिफ्ट म्हणून 'लिबास' चर्चेत रहायला हरकत नाही.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा