• रणवीर असाच आहे... 'पक्का ड्रामेबाज'
SHARE

एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव त्याच्या जवळ गेल्याशिवाय समजत नाही. कलाकारांच्या बाबतीत तर हे जाणून घेणं खूपच कठीण असतं. कारण कित्येकदा ते वास्तवातही अभिनयच करत आहेत की काय असा भास होतो. आज केवळ तरुणाईच नव्हे, तर अबालवृद्धांच्या गळ्यातील ताईत बनलेला रणवीर सिंगचा स्वभाव नेमका कसा आहे? असं कुणी विचारलं तर 'ड्रामेबाज' असंच म्हणावं लागेल.


मनमौजी, मस्तमौला 

निमित्त होतं 'सिम्बा' चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुलाखत घेण्याचं. मुंबईतील जे. डब्ल्यू. मेरिएट हॅाटेलमध्ये रणवीरसह सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुलाखतींच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. रणवीर सकाळपासूनच प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्यात दंग होता. थोडा स्ट्रेस दूर करण्यासाठी तो अधूनमधून हॅाटेल बाहेर यायचा. थोडा मेकअप टच देऊन पुन्हा मुलाखतीत हरवून जायचा. रणवीर मनमौजी आणि मस्तमौला असल्याची जाणीव यावेळी सर्वांनाच आली.


आमंत्रणाशिवाय लग्नाला

याच हॅाटेलमध्ये एका श्रीमंत वर-वधूचा विवाह सोहळा सुरू होता. आमंत्रण नसतानाही रणवीर थेट त्या सोहळ्यात घुसला आणि वधू-वरासह वऱ्हाडी मंडळींनाही आश्चर्याचा धक्का दिला. एरव्ही एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी गलेलठ्ठ रक्कम घेणाऱ्या, न बोलावता आलेल्या या सेलिब्रिटी पाहुण्याचं वऱ्हाडी मंडळींनीही जंगी स्वागत करत फोटो काढण्यासाठी लगबग केली. नवदाम्पत्यांना शुभेच्छा देऊन रणवीरने काढता पाय घेतला आणि पुन्हा मुलाखतींचा सिलसिला सुरू झाला.


खुर्चीवर उभा राहिला

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा घोळका रणवीरची वाट पाहता बाॅलरूममध्ये बसला होता. मधोमध रणवीरसाठी एक रिकामी खुर्ची होती. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रणवीरला वाट नव्हती. तो आला आणि थेट मागे रिकामी असलेल्या एका खुर्चीवर उभा राहिला. दोन्ही हात उंचावून सर्वांना हाय, हॅलो केलं आणि दुसऱ्या क्षणाला तिथून वाट काढत आपल्यासाठी राखून ठेवलेल्या खुर्चीत विराजमान झाला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि हालचाली एखाद्या ड्रामेबाजापेक्षा कमी नव्हत्या.


मर्यादा ठाऊक

प्रश्नोत्तराच्या फैरी सुरू झाल्यावर मात्र एखाद्या शांत मुलाप्रमाणे तो विचारपूर्वक उत्तरं देऊ लागला. त्याचं हे वास्तव रूप पाहून इतकी एनर्जी त्याच्याकडे येते कुठून? हा प्रश्न मनात आला. 'सिम्बा' चित्रपटातही असाच ड्रामेबाज आणि एनर्जेटिक रणवीर दिसणार आहे. आपण काय केलं तर लोकांचं लक्ष वेधलं जाईल, आपल्या मर्यादा काय आहेत आणि आपण कशामुळे यशस्वी होऊ हे सारं काही रणवीरला ठाऊक आहे.


राणी माझी झाली 

 या ड्रामेबाज स्वभावाच्या बळावरच त्याने चित्रपटसृष्टीतील सर्वांत सुंदर अभिनेत्री अर्थात दिपीका पदुकोणला आपली पत्नी बनवण्यात यश मिळवलं हे विसरता येणार नाही. चित्रपटात नसे का, पण वास्तवात मात्र राणी माझी झाली हे देखील तो मोकळेपणाने सांगतो.हेही वाचा - 

अनू मलिकने धरली मराठीची वाट

'क्रिटिक्स चॉइस शॉर्ट फिल्म अॅवॉर्ड्स'ची घोषणा
संबंधित विषय
ताज्या बातम्या