Advertisement

'सचिनः अ बिलियन ड्रिम्स ' आई-बाबांना समर्पित करणार - सचिन तेंडुलकर


'सचिनः अ बिलियन ड्रिम्स ' आई-बाबांना समर्पित करणार - सचिन तेंडुलकर
SHARES

'क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण व्हायला २२ वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता' सचिन तेंडुलकर यांनी आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण आणि अनेक आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते, ‘चला हवा येऊ द्या’ च्या मास्टर ब्लास्टर विशेष भागाचे. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या आगामी भागात क्रिकेटजगताचं दैवत मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आला होता. या भागात सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांची ही अनोखी मैफिल २२- २३ मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात रसिकांना झी मराठीवर अनुभवता येणार आहे.

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची भुरळ मराठी मनोरंजन सृष्टी इतकीच बॉलिवूडलाही पडली. आमिर खान, सलमान, शाहरुख, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन हे चला हवा येऊ द्या चे जबरदस्त फॅन झाले. आता त्यांच्या प्रमाणेच "चला हवा येऊ द्या" च्या चाहत्या वर्गात क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही दाखल झाला आहे.

चला हवा येऊ द्या च्या सेटवर सचिनचे आगमन होताच रसिकांनी 'सचिन सचिन' अशा आरोळ्यांनी सभागृह दणाणून सोडले. या भारावलेल्या वातावरणात सचिन तेंडुलकर यांच्याशी गप्पांची मैफल निलेश साबळे याने रंगवली. निलेशच्या सगळ्या प्रश्नांवर सचिनने तुफान फटकेबाजी केली आणि अवघे सभागृह मंत्रमुग्ध झाले. या अदभुत गप्पांमध्ये आपल्या कुटुंबाविषयी, गुरूंविषयी तसेच आपल्या सहकाऱ्यांबाबत सचिन भरभरून बोलला. “वयाच्या ११ व्या वर्षी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि खेळासाठी १२ व्या वर्षापासून घरापासून दूर राहू लागलो. या दरम्यान घरच्यांबरोबरचे अनेक क्षण मी ‘मिस’ केलेत पण त्याची तक्रार मी कधी करणार नाही कारण क्रिकेट ही माझी निवड होती... त्यामुळे क्रिकेट साठी अनेक गोष्टीचा मला त्याग करावा लागला असं लोक म्हणतात. मी त्याला त्याग वगैरे म्हणणार नाही. ते माझं आयुष्य होतं. मी स्वप्नांचा पाठलाग करत होतो .... ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मला जे करता आलं ते सगळं मी केलं!”

सचिनच्या सोबत त्याची पत्नी अंजली, त्याचे भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहीण सविता तेंडुलकर, तसेच त्याचे मित्र अतुल रानडे, जगदीश चव्हाण आणि अजित भुरे हेही चला हवा येऊ द्या च्या सेटवर आवर्जून हजर होते.

सचिनच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर लवकरच अवतरणार असून क्रिकेट शौकिनांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. ‘सचिनःअ बिलियन ड्रिम्स’ चित्रपट ही आपल्या आयुष्यातली आणखी एक महत्त्वाची खेळी आहे, असं सांगत ही खेळी आपण आपल्या आई-बाबांना समर्पित करणार असल्याचं सचिनने सांगितलं. ‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’ मध्ये साहित्य सहवास ते शिवाजी पार्क मैदान आणि शारदाश्रम शाळा ते भारतरत्न हा सर्वोच्च किताब स्वीकारतानाचा त्याचा प्रवास उलगडला आहे. त्याच रोमहर्षक प्रवासाची झलक त्यानं चला हवा येऊ द्या मध्ये मारलेल्या या खास दिलखुलास गप्पांमधून उलगडत गेली.

'सचिन सचिन' हा जयघोष माझ्या निवृत्तीनंतरही सुरूच राहील, अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. पण आता तो थिएटरमध्येही घुमणार आहे. मला खरंच खूप आनंद वाटतोय, अशा भावनाही त्यानं व्यक्त केल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा