आपल्या दिलखेचक अदाकारी आणि नृत्याच्या बळावर अभिनेत्री माधुरी दीक्षितने अनेकांना घायाळ केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील पदार्पणानंतर पुन्हा हिंदी सिनेमांकडे वळलेल्या माधुरीचा ‘मुजरा’ पाहण्याची संधी लवकरच प्रेक्षकांना लाभणार आहे.
माधुरी सध्या दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांच्या ‘कलंक’ या सिनेमाच्या कामात व्यग्र आहे. या सिनेमात माधुरीवर एक ‘मुजरा’ गाणं शूट करण्यात येणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान आणि रेमो डिसूझा करणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या गाण्याचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. ‘कलंक’मधील सर्व गाण्यांची कोरिओग्राफी रेमोने केली आहे. केवळ माधुरीवरील एका गाण्यासाठी रेमोने सरोज यांच्यासोबत काम केलं आहे. या निमित्ताने रेमो आणि सरोज प्रथमच एका गाण्यासाठी कोरिओग्राफी करणार आहेत.
माधुरी आणि सरोज यांची जोडी तशी नवीन नाही. ‘तेजाब’मधील ‘एक दो तीन...’, ‘बेटा’मधील ‘धक धक...’, ‘खलनायक’मधील ‘चोली के पीछे क्या है...’ या माधुरीवर चित्रीत करण्यात आलेल्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी सरोज यांनीच केलेली आहे. जवळजवळ चार वर्षांनी माधुरी-सरोज पुन्हा एकदा गाण्यासाठी एकत्र आल्या आहेत. चार दिवसांपासून माधुरी ‘कलंक’मधील मुजऱ्यासाठी सरोज आणि रेमो यांच्यासोबत रिहर्सल करत आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी अंधेरीत सेटवर जोरात तयारीही सुरू करण्यात आली आहे.
या गाण्याबाबत सरोज म्हणाल्या की, मागील चार दिवसांपासून आम्ही मुजऱ्याच्या तांत्रिक पैलूंवर काम करतोय. रेमोसोबत कोरिओग्राफ होणारं हे गाणं अविस्मरणीय ठरावं अशी आमची इच्छा आहे. आज लोकांना भारतीय संगीताचा विसर पडत आहे. हे गाणं मात्र पुन्हा त्यांच्या मनात भारतीय संगीताची गोडी निर्माण करेल. ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान या गाण्याचं चित्रीकरण करण्यात येणार असल्याचंही सरोज यांनी सांगितलं. फाॅक्स स्टार स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन, नाडियाडवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या सिनेमात आलिया भट, वरुण धवन, संजय दत्त, आदित्य राॅय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा -
पोलिसांची सूचना धुडकावली, अभिनेत्री शिबानी दांडेकरनं केलं किकी चॅलेंज