Advertisement

आमिर-सलमान-शाहरुख सोडा, मराठी सिनेमे पहा - सयाजी शिंदे


आमिर-सलमान-शाहरुख सोडा, मराठी सिनेमे पहा - सयाजी शिंदे
SHARES

मराठी-हिंदीसह दक्षिणात्य सिनेसृष्टीतही मराठीचा झेंडा मानाने फडकवत ठेवणारा अभिनेता सयाजी शिंदे पुन्हा एकदा गोट्या या खेळाच्या प्रेमात पडला आहे. ‘गोट्या’ या आगामी सिनेमात सयाजीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेला ‘गोट्या’ हा सिनेमा ६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या भगवान पाचोरे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ‘मुंबई लाइव्ह’शी संवाद साधत सयाजीने गोट्या हा खेळ आणि सिनेमाविषयी आपलं मत व्यक्त केलंच, त्यासोबत मराठी रसिकांनी मराठी सिनेमे पहायलाच हवेत असं हक्काने सांगितलं...


आपल्या मातीतील खेळ

गोट्या हा आपल्या मातीतील खेळ आहे. आजवर मी क्रिकेटवर, हॅाकीवर सिनेमे पाहिले. पण गोट्यासारख्या सर्वसामान्यांच्या खेळावर सिनेमा बनवण्याचं धाडस अद्याप कोणीही केलं नव्हतं. ‘गोट्या’ या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक भगवान पाचोरे आणि निर्माते केतनभाई सोमय्या यांनी ते धाडस केलं आहे. प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, अशी अपेक्षा सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.


मराठी सिनेमे पाहा

मराठी भाषेचा, मराठी मातीचा, मराठी अस्मितेचा अभिमान असेल, तर ‘गोट्या’ हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात नक्की याल. सारखं आपलं आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान यांचेच सिनेमे काय पाहता? आपल्या मातीतला मराठी सिनेमाही पाहा आणि तो सिनेमागृहामध्ये जाऊनच पाहा असं सयाजीने बजावलं आहे.


गोट्या एक स्वप्न

गोट्यासारखा खेळ आज दुर्लक्षित आहे. हा खेळ जर आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला, तर काय होऊ शकतं ते ‘गोट्या’ या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. गोट्या या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं स्वप्न या सिनेमाच्या निमित्ताने पाहिलं गेलं आहे. याचे साक्षीदार मराठी रसिकही व्हायला हवेत.


गावचा सरपंच

या सिनेमात मी गावच्या सरपंचाच्या भूमिकेत आहे. हा सरपंच अतिशय उद्धट आणि रागीट आहे. सुरुवातीला गोट्या खेळायला त्याचा विरोध असतो. पण त्याचा मुलगाच गोट्या खेळत असतो. त्यामुळे हळूहळू त्याचा विरोध कसा पाठिंब्यामध्ये बदलत जातो आणि त्याला आपल्या मुलाचं कौतुक वाटू लागतं ते या सिनेमात पाहायला मिळेल. अशक्य असलेली गोष्ट शक्य होऊ शकते ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.


पुन्हा या खेळाने गाठलंच

मी लहानपणी खूप गोट्या खेळलो आहे. आमच्या वेळी दगडाच्या गोट्या होत्या. नंतर काचेच्या गोट्या, हडक्या गोट्या आल्या. गोट्यांसाठी खूप मारही खाल्ला. पण खूप मजा यायची. या सिनेमाच्या निमित्ताने हा खेळ पुन्हा नव्याने अनुभवता आला. मी जेव्हा गोट्या खेळायचो, तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर हा खेळ खेळला जातो हे माहित नव्हतं. त्यावेळी मुंबई शहर काय आहे तेच ठाऊक नव्हतं, पण पुन्हा या खेळाने माझा पाठलाग केला आणि या सिनेमाशी जोडलो गेलो.


पुनरुज्जीवीत व्हायला हवा

गोट्यांचा खेळ आज हद्दपार झाला आहे. तो पुनरुज्जीवत व्हावा ही माझी खूप इच्छा आहे. यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. शाळेत या खेळाच्या कॅाम्पिटीशन्स भरवल्या पाहिजेत. ज्यावेळी शाळेत हा खेळ खेळायला सुरुवात होईल, तेव्हा तो पुन्हा एकदा घराघरातही पुनरुज्जीवीत होईल. कमी जागेत खेळता येणारा हा खेळ आहे. जर तुम्ही कॅरम खेळू शकता, तर गोट्या का खेळू नये? हा विचार केला तर मला वाटतं की गोट्यांचा खेळ पुनरुज्जीवन होऊ शकतो आणि तो व्हायला हवा.



हेही वाचा -

बिग बाॅस : आऊ आणि शर्मिष्ठामध्ये जुंपणार !

'रे राया...'च्या गीतांना जावेद, कैलाश, वैशालीसह मंगेशचा सूर!


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा