SHARE

मुलुंडमध्ये लहानाचे मोठे झालेले विकास साठ्ये या मराठमोळ्या अभियंत्यानं तांत्रिक विभागासाठी दिल्या जाणाऱ्या 'सायंटिफिक अँड टेक्निकल ऑस्कर २०१८'वर आपलं नाव कोरलं आहे. शनिवारी केलिफोर्नियातील बेव्हर्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात 'के 1 शॉटओव्हर' या कॅमेरा तंत्राच्या निर्मितीची कल्पना, डिझाईन, इंजिनिअरिंग आणि अंमलबजावणी केल्याबद्दल निवड करण्यात आलेल्या चार जणांच्या चमूला या पुरस्काराने गौरवण्यात आलं.


साठ्येंनी व्यक्त केलं मनोगत

साठ्ये यांनी प्रसार माध्यमांसमोर आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं, "२००९ मध्ये न्यूझिलंडमधील क्वीनस्टोन भागातली शॉटओव्हर कॅमेरा सिस्टीम या कंपनीशी जोडलो गेलो. येथील निसर्गसौंदर्यामुळे अनेक सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक क्वीनस्टोनकडे आकर्षित व्हावेत, म्हणून ही कंपनी येथे सुरु केली."

साठ्ये पुढे म्हणाले, 'कॅमरा माउंट' ही अशी वस्तू आहे, जी या कॅमेरा आणि लेन्समध्ये बसवण्यात आली आहे. यामुळे फोटो किंवा व्हिडिओ काढताना त्याच्या क्वालिटीवर कोणताच परिणाम होऊ देत नाही. याशिवाय हा कॅमेरा ऑपरेटरशिवाय आपोआप हव्या त्या अँगलला वळवता येतो.

विकास साठ्ये हे मूळचे पुण्याचे असून मुलुंडमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. पुढे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. तिथेच त्यांना इटलीला जाण्याची संधी मिळाली. त्यांना मिळालेल्या या आॅस्कर पुरस्कारामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या