'माहेरची साडी'चा सिक्वेल येणार...!

  Mumbai
  'माहेरची साडी'चा सिक्वेल येणार...!
  मुंबई  -  

  मराठी सिनेसृष्टीत गाजलेल्या 'माहेरची साडी' या सिनेमाचा लवकरच  सिक्वेल येणार आहे. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि त्याकाळी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आजही प्रेक्षकांच्या तो तितकाच लक्षात आहे. लवकरच त्या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  त्यासंदर्भात आम्ही 'माहेरची साडी' या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितले की, 'हल्ली बऱ्याच हिंदी सिनेमांचे सिक्वेल येतायत आणि लोक ते आवडीने बघतातही. 'माहेरची साडी' हा त्यावेळचा खूप गाजलेला सिनेमा आहे. आताही तो सिनेमा टीव्हीवर लागला तर त्याचा टीआरपीही चांगला आहे. म्हणजे प्रेक्षक आजही हा सिनेमा आवर्जून पाहतात. म्हणून याचा सिक्वेल काढायचा आम्ही विचार केला.'

  या सिनेमात कोणती स्टारकास्ट दिसणार यावर त्यांनी अजून तरी विचार केलेला नाही. पण साधारणपणे नोव्हेंबरमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरू होईल आणि २०१८ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असंही त्यांनी सांगितलं.

  भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्यावर आधारलेल्या 'माहेरची साडी' चित्रपटात अलका कुबल, विक्रम गोखले, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर हे कलाकार झळकले होते. आता सिक्वेलमध्ये कोण असणार? याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.