Advertisement

शाहरुख-रितेशच्या लढतीला अजय-अतुलचा बँडबाजा

२१ डिसेंबर २०१८ रोजी शाहरुख खानचा ‘झीरो’ आणि रितेश देशमुखचा ‘माऊली’ असे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. हिंदी आणि मराठी भाषेतील या दोन्ही सिनेमांना अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे.

शाहरुख-रितेशच्या लढतीला अजय-अतुलचा बँडबाजा
SHARES

बॅाक्स आॅफिसवर दोन बड्या कलाकारांची टक्कर होणं हे आता तसं नवं राहिलेलं नाही. सिनेमांच्या संख्येत झालेली वाढ आणि सणासुदीचे मुहूर्त कॅश करण्यासाठी लागणाऱ्या चढाओढीमुळे दोन बड्या कलाकारांचे सिनेमे क्लॅश होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण एकाच संगीतकार जोडीचे दोन वेगवेगळ्या भाषेतील मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होण्याचं प्रमाण फार अल्प आहे. अशा संगीतकारांच्या यादीत आता अजय-अतुल या मराठमोळ्या संगीतकार जोडीचंही नाव सामील होणार आहे.

२१ डिसेंबर २०१८ रोजी शाहरुख खानचा ‘झीरो’ आणि रितेश देशमुखचा ‘माऊली’ असे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. हिंदी आणि मराठी भाषेतील या दोन्ही सिनेमांना अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. एकाच दिवशी एकाच संगीतकाराचे दोन वेगवेगळ्या भाषेतील मोठे सिनेमे प्रदर्शित होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.


पुन्हा ‘माऊली’च्या रूपात

‘लय भारी’ या सिनेमानंतर रितेश देशमुख कोणत्या मराठी सिनेमात दिसणार या प्रश्नाचं उत्तर त्याच्या चाहत्यांना केव्हाच मिळालेलं आहे. ‘लय भारी’मध्ये रितेशने साकारलेला माऊली प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. आता ‘माऊली’ या सिनेमात रितेश पुन्हा काहीशा जुन्याच रूपात भेटणार आहे. आदित्य सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.


शाहरुख बनला ‘झीरो’

याच दिवशी शाहरुखचा ‘झीरो’देखील येणार आहे. या सिनेमाची उत्सुकता शाहरुखच्या चाहत्यांसोबत सर्वांनाच आहे. आनंद एल. राय यांचं दिग्दर्शन आणि कतरीना कैफ-अनुष्का शर्मा पुन्हा शाहरुखसोबत असल्याने या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही सिनेमांना अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे.


शाहरुख-रितेश आमनेसामने

रितेशची मुख्य भूमिका असलेल्या ‘हे बेबी’ या सिनेमात शाहरुखने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारल्याचा अपवाद वगळता शाहरुख-रितेश सिनेमात एकत्र आले नाहीत. पण आता हे दोन्ही कलाकार थेट बॅाक्स-आॅफिसवर आमने-सामने उभे ठाकले दिसणार आहेत. या दोन्ही सिनेमांमध्ये संगीतकार अजय-अतुल हे एकमेव साम्य आहे.


तो दिवस अजय-अतुलचा

हे चित्र पाहता २१ डिसेंबर हा अजय-अतुलचा दिवस असल्याचं दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले. ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना आदित्य म्हणाले की, अजय-अतुल आज केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदीतही टॅापवर आहेत. लोककलेचा बाज आणि पाश्चत्य संगीताची जाण असलेली ही जोडी केवळ तरुणाईच्याच नव्हे, तर सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं संगीत देण्यात यशस्वी ठरत आहे.


१० वर्षांनी योग

अजय-अतुल यांनी माझ्या ‘उलाढाल’ या पहिल्या मराठी सिनेमाला संगीत दिलं हेातं. त्यातील ‘मोरया, मोरया...’ हे गाणं सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप गाजलं होतं. आता ‘माऊली’च्या निमित्ताने १० वर्षांनी पुन्हा या गुणी संगीतकारांसोबत काम करण्याचा योग जुळून आला आहे. ‘माऊली’मध्ये चार गाणी असून, ती गुरू ठाकूरने लिहिली आहेत.


दसऱ्याला संगीत प्रकाशन

‘माऊली’चं संगीत दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रकाशीत करण्यात येणार आहे. या सिनेमात कशा प्रकारचं संगीत आहे ते रसिकांना पहिल्या गाण्यातच समजेल. वेगवेगळ्या जॅानरची चार गाणी रसिकांचे कान तृप्त करतील. भक्ती, वारी, ठेका आणि संगीताचा अद्भुत संगम ‘माऊली’मध्ये अनुभवायला मिळेल.


जराही भीती नाही

‘झीरो’ या सिनेमासमोर ‘माऊली’ प्रदर्शित होत असल्याने मुळीच भीती वाटत नाही. याउलट मराठी संगीतप्रेमींना अजय-अतुल यांच्या संगीताचे दोन परस्पर भिन्न पैलू अनुभवयाला मिळतील. याचा दोन्हीही सिनेमांना फायदाच होईल. मराठीच्या बाजावर अजय-अतुल यांची चांगली पकड असल्याचा ‘माऊली’ला नक्कीच लाभ होईल.


‘माऊली’ की ‘झीरो’?

तसं पाहिलं तर दोन्ही सिनेमांची भाषा आणि प्रेक्षकवर्ग भिन्न आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये तुलना करणं चुकीचं ठरेल.  पण या दोन सिनेमांमध्ये बाजी कोण मारतं हे पाहण्याची उत्सुकता असेलच. अजय-अतुल यांच्या दृष्टिकोनातून मात्र दोन्ही सिनेमे समान पातळीवरील आहेत.



हेही वाचा -

‘हॅप्पी’साठी जस्सी शिकला मंदारीन

राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा