Advertisement

टुरिंग टाॅकीजला हवी जीएसटीत सूट, लाॅकडाऊनमुळे झालं मोठं नुकसान

टुरिंग टॉकीजला वस्तू व सेवा करातून सूट मिळावी, अशी मागणी टुरिंग टाॅकीज मालकांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

टुरिंग टाॅकीजला हवी जीएसटीत सूट, लाॅकडाऊनमुळे झालं मोठं नुकसान
SHARES

गाव-खेड्यामधील सिनेमागृहांची कमतरता भरून काढण्यात आणि सिनेमा तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात टुरिंग टॉकीजचा महत्त्वाचा वाटा आहे. परंतु लॉकडाऊन दरम्यान आणि नंतरच्या काळातही प्रेक्षकवर्गच नसल्याने, कोरोनासंबंधी नियमावलीने टुरिंग टॉकीजचे खेळ बंद झाले आहेत. परिणामी टुरिंग टाॅकीज मालकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे टुरिंग टॉकीजला वस्तू व सेवा करातून सूट मिळावी, अशी मागणी टुरिंग टाॅकीज मालकांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. 

राज्यातील टुरिंग टॉकीजच्या प्रश्नांसदर्भातील बैठक सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरीचे संचालक संजय पाटील यांच्यासह टुरिंग टॉकीज चालविणारे मालक उपस्थित होते. टुरिंग टाॅकीज मालकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर या सवलतीसाठी अर्थ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.

हेही वाचा- सरसकट लॉकडाऊन नको, कठोर निर्बंध करण्याचं मंत्र्यांचं मत

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख पुढं म्हणाले, आज राज्यभरात जवळपास ५० हून अधिक टुरिंग टॉकीज सुरु आहेत. यामध्ये ९० टक्के मराठी आणि १० टक्के हिंदी सिनेमे दाखविण्यात येतात. टुरिंग टॉकीजमुळे सिनेमा गावागावात पोहोचण्याबरोबरच अत्यल्प दरात प्रेक्षकांचे मनोरंजन होत असतं. या क्षेत्राला बळकटी देण्याबरोबरच टुरिंग टॉकीज मालकांना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नव्याने कोणती योजना लागू करता येईल, याचाही विचार करण्यात येत आहे. 

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथून सिनेमा, मालिका, जाहिरात आणि ओटीटी माध्यमांना चित्रीकरण करण्याची परवानगी एक खिडकी परवाना योजनेच्या माध्यमातून दिली जाते. आता टुरिंग टॉकीजला यामध्ये कसं सामावून घेता येईल याबाबतही विचार करण्यात येईल. वर्षभरातून येणारे यात्रा, महोत्सव लक्षात घेता टुरिंग टॉकीज मालकांना पोर्टेबल मीटर देणे, शासनामार्फत देण्यात येणारी पेन्शन योजना टुरिंग टॉकीज मालकांना देता येईल का याबाबत अभ्यास करणं आणि भांडवली अनुदान उपलब्ध कसं करुन देता येईल याबाबत सांस्कृतिक कार्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा असे निर्देश अमित देशमुख यांनी दिले.

(touring talkies owners in maharashtra wants concession in gst due to lockdown)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा