हटके मनोरंजनाचा दे धक्का...


हटके मनोरंजनाचा दे धक्का...
SHARES

मुंबई - विक्रमादित्य मोटवाने हा दिग्दर्शक वेगळेपणानं नुसता झपाटलेला आहे. उडान,लुटेरे या चित्रपटांमधूनच त्याची सिनेमा या माध्यमाबद्दलची वेगळी नजर लक्षात आली होती.'ट्रॅप्ड'या चित्रपटाद्वारे तो आपल्या वेगळेपणाबद्दल आणखी चार पावलं पुढं गेलाय. चित्रपट म्हणजे मनोरंजन हे रूढ समीकरण. मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांना आपल्या कथानकात गुंतवण्याचा एक वेगळाच फंडा दिग्दर्शकानं'ट्रॅप्ड'या चित्रपटामधून वापरलाय. एका खोलीत, एका व्यक्तिरेखेवर जवळपास दीड तासाचा व्यावसायिक चित्रपट करणं हे खरं तर अशक्यकोटीतलं काम. मात्र दिग्दर्शकानं आपल्या कल्पकतेच्या जोरावर हे काम आपल्या टीमद्वारे खूप चांगल्या पद्धतीनं पडद्यावर उतरवलं आहे. हिंदी चित्रपट म्हणजे नाच, गाणी, विनोद एवढंच ठाऊक असणाऱ्यांना हा चित्रपट म्हणजे मोठा दे धक्का आहे. तो नक्कीच अनुभवायला हवा.

शौर्या (राजकुमार राव) आणि नूरी (गीतांजली थापा) या दोन व्यक्तिरेखांपासून चित्रपटाची सुरुवात होते. एकाच ऑफिसात काम करणारे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र नूरीचं लग्न अगदी चार दिवसांवर आलेलं असतं. लग्नाच्या दोन दिवस आधी हे दोघे एकत्र येतात. नूरीच्या प्रेमात पडलेला शौर्या तिला लग्नाची मागणी घालतो. मात्र शौर्याचं स्वतःचं घर नसल्यामुळे ती त्याला लग्नासाठी नकार देते. तेव्हा शौर्या तिला अवघ्या 1 दिवसांमध्ये घर घेण्याचं आश्वासन देतो. भाड्यानं घर घेण्यासाठी बाहेर पडलेल्या शौर्याला मुंबईच्या खऱ्या समस्येशी सामना करावा लागतो. एका खोलीसाठी त्याचं बजेट असतं 15 हजार रुपये. परंतु, 20-25 हजारांच्या आत यायला एकही इस्टेट एजंट तयार होत नाही. एका एजंटशी शौर्या बोलत असताना एक व्यक्ती त्यांचं संभाषण ऐकते. ही व्यक्ती शौर्याला एका पूर्ण झालेल्या परंतु ओसी नसल्यामुळे ग्राहकांना ताबा मिळाला नसलेल्या एका इमारतीत घेऊन जाते. या इमारतीच्या 35व्या मजल्यावरील एका फ्लॅटसाठी 15 हजारांचा सौदा ठरवला जातो. शौर्याचे टार्गेट फक्त आपलं लग्न असल्यामुळे तो या फ्लॅटबद्दल कसलीच चौकशी करत नाही. या फ्लॅटमध्ये रात्र काढून सकाळी नूरीबरोबर लग्न करण्याचा त्याचा प्लॅन असतो. मात्र फ्लॅटमधून गडबडीत बाहेर पडताना किल्ली बाहेर आणि तो आतमध्ये राहतो. काही केल्या दार काही उघडत नाही आणि इथून शौर्याचे हाल सुरू होतात. या फ्लॅटमध्ये वीज नसल्यामुळे शौर्याचा मोबाईल बंद पडतो आणि जीवन-मरणाचा संघर्ष सुरू होतो.

अमित जोशी आणि हार्दिक मेहता यांनी 'ट्रॅप्ड'ची कथा-पटकथा लिहिली आहे. 105 मिनिटांचं हे कथानक कुठंही कंटाळवाणं होणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. शौर्या फ्लॅटमध्ये अडकल्यानंतर त्याच्यावर एकापाठोपाठ एक आलेली संकटं ज्या पद्धतीनं दाखविली आहेत. ती पाहिल्यानंतर लेखक-दिग्दर्शकाला दाद द्यावीशी वाटते. अशाप्रकारच्या कथानकामध्ये साचेबद्धपणा येण्याचा खूप संभव असतो. मात्र चित्रपटात तो कुठेही न येण्याचं श्रेय लेखक-दिग्दर्शकालाच द्यावं लागेल. फ्लॅटमधून बाहेर पडण्यासाठी शौर्यनं केलेला संघर्ष खिळवून ठेवण्याजोगा आहे. या कथानकाला पुरेपूर न्याय दिला आहे तो राजकुमार रावनं. शौर्यच्या व्यक्तिरेखेमधील सर्व बारकावे त्यानं छान टिपले आहेत. सुरुवातीला फ्लॅटमधून बाहेर पडण्यसाठी धडपडणारा आणि नंतर सर्व मार्ग खुंटल्यामुळे हताश होणाऱ्या शौर्यच्या मनातील कोंडमारा त्यानं चांगला टिपला आहे. नूरी, इमारतीचा वॉचमन या व्यक्तिरेखा छोट्या असल्या तरी परिणामकारक झाल्यात. चित्रपटाचं पार्श्वसंगीत कथानकाचा ताण आणखी गहिरा करण्याचं नेमकं काम करतं.


संबंधित विषय