Advertisement

उमा भेंडे यांचे निधन


उमा भेंडे यांचे निधन
SHARES

साठ आणि सत्तरच्या दशकात घरंदाज रुप, सोज्वळ व्यक्तिमत्वाच्या भूमिकांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे बुधवारी मुंबईतल्या सायनमधल्या निवासस्थानी निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. मुळच्या कोल्हापुरच्या असलेल्या उमा यांचे मूळ नाव अनुसया. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी त्यांचे उमा हे नवे नामकरण केले.

उमा यांचा कलाप्रवास

उमा यांनी आपल्या अभिनयप्रवासात थोरातांची कमळा, पाच रंगांची पाखरे, शेवटचा मालुसरा, मधुचंद्र, भालू, आम्ही जातो आमुच्या गावा, मल्हारी मार्तंड सारख्या चित्रपटांमध्ये स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्यावर चित्रित झालेली हे चिंचेचे झाड, हवास मज तू, अखेरचा हा तुला दंडवत, मधु इथे आणि चंद्र तिथे, गंध फुलांचा गेला सांगून सारखी अनेक गाणी फार गाजली. मराठीसोबतच त्यांनी हिंदी तसेच दक्षिणात्य भाषेतल्या चित्रपटांमध्येही अभिनय केला. राजश्री प्रॉडक्शनच्या ‘दोस्ती’ मधला त्यांचा अभिनयही वाखाणला गेला. कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी केलेली ‘आई थोर तुझे उपकार’ या चित्रपटातल्या मध्यवर्ती भूमिकेतही त्यांनी चरित्र व्यक्तिरेखेचा आब राखला. या चित्रपटाच्या त्या निर्मात्याही होत्या. चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना  राज्य सरकारच्या वतीने 2013-14 साली  'व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारा'ने तसेच 2012 साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने 'चित्रभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 

अभिनेता, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. उमा-प्रकाश ही वास्तवातली जोडी चित्रपटाच्या पडद्यावरही गाजली.

चित्रपटसृष्टीत शोक

उमा यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपटसृष्टीने एक जुनी जाणती अभिनेत्री गमावली, या शब्दांत अनेक कलावंत, तंत्रज्ञांनी उमा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  


मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांच्या निधनाने मराठी चित्रपट क्षेत्राने सोज्वळ अभिनेत्रीला गमावलेे आहे. 2013-14 यावर्षीचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन्मानित श्रीमती भेंडे यांनी मराठी चित्रपटांसमवेत हिंदी चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. दोस्ती या सुपरहिट ठरलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटातून त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनाने जुन्या जमान्यातील एक ज्येष्ठ अभिनेत्रीला चित्रपटसृष्टी मुकली.

विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा