शब्दप्रधान गायकीवर प्रभुत्व गाजवणारे यशवंत देव

सर्व प्रकारच्या गीतांना सुमधूर देणारे ज्येष्ठ गीतकार-संगीतकार यशवंत देव (९२) यांचं आज पहाटे १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास निधन झालं. प्रकृती बिघडल्यानं १० आॅक्टोबरपासून सुश्रुषा रुग्णालयात देव यांच्यावर उपचार सुरू होते. आठवड्याभरापूर्वी प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात डॅाक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • शब्दप्रधान गायकीवर प्रभुत्व गाजवणारे यशवंत देव
  • शब्दप्रधान गायकीवर प्रभुत्व गाजवणारे यशवंत देव
  • शब्दप्रधान गायकीवर प्रभुत्व गाजवणारे यशवंत देव
SHARE

मराठी चित्रपटगीतांपासून भावगीतांपासून सर्व प्रकारच्या गीतांना सुमधूर देणारे ज्येष्ठ गीतकार-संगीतकार यशवंत देव (९२) यांचं आज पहाटे १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास निधन झालं. प्रकृती बिघडल्यानं १० आॅक्टोबरपासून सुश्रुषा रुग्णालयात देव यांच्यावर उपचार सुरू होते. आठवड्याभरापूर्वी प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात डॅाक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देव यांच्या जाण्याने मराठी संगीतक्षेत्रातील देवतुल्य व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


१ नोव्हेंबर १९२६ साली जन्मलेल्या देव यांनी वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा पुढे सुरू ठेवत आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे देवांची पावलं संगीतक्षेत्राकडे वळली. त्यानंतर मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गझल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत अशा विविध गीत-संगीत प्रकारांमध्ये मुशाफिरी करत देव यांनी संगीतप्रेमींना जणू सुमधूर संगीताचा नजराणाच सादर केला.


रेशनिंग ऑफिसमध्ये केली नोकरी

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संगीत आणि संसार यांचा ताळमेळ साधताना देव यांनी लग्नानंतर रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीही केली. नोकरी करत असतानाच त्यांना ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची आॅफर मिळाली आणि त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पारही पाडली. १९५१ मध्ये देव यांना त्या काळी संगीतक्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या एचएमव्ही म्युझिक कंपनीत सतारवादक म्हणून नोकरी लागली. इथेच त्यांच्या करियरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली आणि त्यांची नेत्रदीपक कामगिरी करण्याच्या दृष्टिने वाटचाल सुरू झाली. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना ते गुरुस्थानी मानत.


‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटासाठी देव यांनी संगीतबद्ध केलेली गाणी खूप लोकप्रिय झाली. भारतरत्न लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर यांसारख्या आघाडीच्या गायकांसोबत देव यांनी काम केलं आहे. ‘या जन्मावर, या जगण्यावर...’, ‘नको जाऊ कोमेजून..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे...’, ‘भातुकलीच्या खेळामधली...’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर...’, ‘श्रीरामाचे चरण धरावे...’, ‘दिवस तुझे हे फुलायचे...’, ‘अशी पाखरे येती...’, ‘असेन मी नसेन मी...’, ‘ठुमकत आल्या किती गौळणी...’, ‘काही बोलायाचे आहे...’, ‘डोळ्यात सांजवेळी आणू...’, ‘गणपती तू गुणपती तू...’, ‘कुणी काही म्हणा...’, ‘कामापुरता मामा...’, ‘करिते जीवनाची भैरवी...’ अशा देव यांनी संगीतबद्ध केल्या आहेत.


'हे' संगीत कार्यक्रम गाजले

शब्दप्रधान गायकीसोबत त्यांनी कवितालेखन, रुबाया, विडंबनगीतं यांसारख्या काव्यरचनाही यशस्वीपणे हाताळल्या. आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘शब्दप्रधान गायकी’, ‘असे गीत जन्मा येते’, ‘रियाजाचा कानमंत्र’ असे देव यांनी सादर केलेले कार्यक्रम विशेषत्वाने गाजले.

गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी देव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. ‘अक्षरफुले’ आणि ‘गाणारे शब्द’ हे त्यांचे संग्रह प्रकाशित झाले असून, त्यांनी आत्मचरित्रात्मक लेखनही केलं आहे.


हेही वाचा - 

संगीतातील 'देव' देवाघरी, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन

संबंधित विषय
ताज्या बातम्या