विद्या म्हणते...मी सार्वजनिक मालमत्ता नाही

 Mumbai
विद्या म्हणते...मी सार्वजनिक मालमत्ता नाही

मुंबई - 'मी काही सार्वजनिक मालमत्ता नाही'. हे शब्द आहेत बॉलिवूडची सिल्क स्मिता विद्या बालनचे. एका कार्यक्रमादरम्यान विद्याच्या एका चाहत्याने तिच्याशी गैरवर्तन केल्यानंतर तिने संतापात या शब्दांत आपला संताप व्यक्त केला.

मुंबईत गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान विद्यासोबत तिच्या एका चाहत्याने फोटो काढण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला नकार देणाऱ्या विद्याने अखेर खूप आग्रहानंतर त्याच्यासोबत फोटो काढायला तयारी दर्शवली. त्यानुसार हा चाहता तिच्या बाजूला फोटो काढण्यासाठी उभा देखील राहिला. मात्र फोटो काढताना त्याने थेट विद्याच्या खांद्यावर हात ठेवला. हे खटकल्यामुळे विद्याने त्याला असं न करण्याबद्दल सांगितलं. मात्र तरीही त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. 

हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर विद्याच्या मॅनेजरने त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र तरीही त्याने ऐकले नाही. त्यामुळे विद्या चांगलीच भडकली. हे सर्व सुरु असताना तिथे 'बेगम जान' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीजित मुखर्जीदेखील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांनी या प्रकाराबद्दल विचारले असता विद्याने आपला संताप व्यक्त केला. "मी लोकप्रिय आहे. मात्र सार्वजनिक मालमत्ता नाही. त्यामुळे हे असले प्रकार मी अजिबात सहन करून घेणार नाही", असं विद्या यावेळी म्हणाली.

Loading Comments