Advertisement

श्वसनाच्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ९ टक्के गोवंडीकर

दिवसेंदिवस गोवंडी परिसरात प्रदुषणाचा धोका वाढत आहे.

श्वसनाच्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ९ टक्के गोवंडीकर
SHARES

दिवसेंदिवस गोवंडी परिसरात प्रदुषणाचा धोका वाढत आहे. परिणामी, या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेकांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये श्वसनाच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी नऊ टक्के नागरिक एकट्या गोवंडीतील आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून देवनार कचराभूमीतून पसरणारी दुर्गंधी, प्रदुषण आणि त्यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न याचा मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागाच्या हद्दीतील गोवंडी – शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच २००९ मध्ये याच परिसरात रुग्णालयातील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रकल्प उभारला.

एसएमएस कंपनीमार्फत हा प्रकल्प चालवण्यात येत आहे. या कंपनीत मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. या कंपनीमधून मोठ्या प्रमाणात विषारी धूर हवेत सोडला जातो. याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. त्यामुळे ही कंपनी या परिसरातून हद्दपार करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे.

या संदर्भात रहिवाशांनी महानगरपालिकेकडे तकारीही केल्या आहेत. तसेच रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली आहेत. मात्र तक्रार, आंदोलनांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

गेल्या तीन – चार वर्षांत या परिसरामध्ये अनेक सिमेंट मिक्सर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. लोकवस्तीजवळ या प्रकल्पांना बंदी असताना महानगरपालिकेच्या एम पूर्व कार्यालयाजवळ आणि इतर ठिकाणी अनेक अनधिकृत प्रकल्प उभे राहिले आहेत. या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडत असल्याने, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार होत आहेत.



हेही वाचा

BMC Budget 2023-24: मुंबईतल्या 'या' 5 गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर उभारणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा