झाडे वाचवण्यासाठी आता चिपको आंदोलन

 Mumbai
झाडे वाचवण्यासाठी आता चिपको आंदोलन

मुंबई - मेट्रो 3 आणि झाडांच्या कत्तलीविरोधातील आंदोलन आता पेटतच चाललं आहे. कोणत्याही परिस्थितीत झाडे तोडू दिली जाणार नाहीत, असं म्हणत कफ परेड आणि चर्चगेटमधील रहिवाशांनी आता चिपको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरातील झाडे तोडण्यासाठी पालिका कर्मचारी आले की रस्त्यावर उतरून रहिवाशी झाडांना मिठी मारणार असल्याची माहिती 'सेव्ह ट्री'च्या सदस्या निरा पुंज यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे.

मंगळवारी येथील झाडे तोडली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर 'सेव्ह ट्री'ने त्याला विरोध करत आंदोलनाचा इशारा दिल्याने ही कारवाई होऊ शकली नाही. बुधवारी ही कारवाई होण्याची शक्यता असल्याने आता 'सेव्ह ट्री'ने आपले आंदोलन आणखी तीव्र केले आहे. त्यानुसार चिपको आंदोलन छेडले आहे. पुंज यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात हे प्रकरण असतानाही चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केली जात आहे. त्यातही अजून एमएमआरसीने झाडे तोडण्यासाठीची परवानगी मिळवलेली नाही. जमीन हस्तांतरीत केलेली नाही. एकूणच एमएमआरसी कायद्याच्याविरोधात जाऊन ही कारवाई करत आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विरोध करणारच असंही पुंज यांनी स्पष्ट केलं. तर, झाडे न कापता मेट्रो राबवता येत असल्याकडे एमएमआरसी आणि सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

एमएमआरसीचे कार्यकारी संचालक (नियोजन) आर. रमण्मा यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व परवानग्या एमएमआरसीने घेतल्या असून कायद्याच्या चौकटीतच हे काम केले जात आहे. तर रहिवाशांच्या विरोधाला न जुमानता झाडे तोडण्याची कारवाई करत मेट्रो मार्गी लावणार असा पुनरूच्चारही त्यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना केला आहे.

Loading Comments